सर्वस्पर्शी नेतृत्व, स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्त्व, संयमी स्वभाव, भारत व इंडिया या दोघांनाही जाणणारा नेता.. शरद पवार यांच्या अशा विविध पैलूंबाबत चर्चा होत असतानाच पंतप्रधानपदापर्यंत ते का पोहोचू शकले नाहीत, त्याबाबत कोणत्या चुका झाल्या यावरही विविध मते शनिवारी ‘समग्र शरद पवार’ या विषयावरील चर्चेत व्यक्त झाली. चौदाव्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अंतर्गत या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे, राजकीय विश्लेषक प्रताप आसबे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला. पत्रकार प्रसन्न जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
शरद पवार व पंतप्रधानपद अशा आशयाच्या प्रश्नावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले, पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत, ही अनेकांची इच्छा आहे. त्यांच्यात ती क्षमताही आहे. पण, आजवर महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही, हे शल्य अनेकांच्या मनात आहे. त्यांनी सर्व घटकांसाठी काम केले, पण त्यांना जनतेची साथ मिळाली नाही. एकहाती सत्ता न मिळाल्याने नेहमी आघाडी व तडजोडीचे राजकारण करावे लागले.
आसबे म्हणाले, पवार १९८६/८७ च्या काळामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, ती मोठी चूक झाली. त्या काळात विरोधाकांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्याच वेळी त्यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असती. फुटाणे म्हणाले, पवार एस काँग्रेसमध्येच राहिले असते, तर देवेगौडांच्या ऐवजी पवारच पंतप्रधान झाले असते. राष्ट्रवादीची स्थापना करण्यापूर्वी पवार पुन्हा काँग्रेसबाहेर पडले, मात्र तेव्हा ते काँग्रेसमध्येच असते, तर मनमोहन सिंग यांच्याऐवजी ते पंतप्रधान झाले असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी केले.
‘त्यांना निवृत्त व्हायला आवडत नाही’
शरद पवार यांनी आत्मचरित्र लिहिल्यास सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय इतिहास समोर येईल. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहावे, अशी अपेक्षा चर्चेत व्यक्त झाली. त्यावर बोलताना प्रताप आसबे म्हणाले, पवार यांना मागे वळून पहायला व निवृत्त व्हायलाही आवडत नाही. त्यामुळे ते शेवटपर्यंत राजकारणात राहतील. म्हणूनच ते आत्मचरित्र लिहितील असे वाटत नाही. फुटाणे म्हणाले, पवार सर्वाना एनर्जी देतात, पण त्यांना एनर्जी देणारे नाहीत, हे दुर्दैव आहे. ते स्वत: लिहितील तेव्हा खूप काही पुढे येईल. स्वत:चा मतदारसंघ सांभाळून त्यांनी देशाचे राजकारण केले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणताही प्रभाव बारामतीत चालला नाही. साहित्याची आवड व तर्कशुद्ध विचार हा महत्त्वाचा गुण त्यांच्यात आहे.