News Flash

राजकारणात विरोधकांना शत्रू समजू नका- शरद पवार

सामान्य माणसांशी बांधीलकी ठेवून त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली.

राजकारणात विरोधक असतात आणि मतभेद देखील असतात; पण विरोधकांना शत्रू समजू नका. देश आणि राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामान्य माणसांशी बांधीलकी ठेवून त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली.
पुणे महानगरपालिकेतर्फे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन खास सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्यांनी महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांना काम कसे करावे याचा सल्ला देत सामान्य माणसांशी बांधीलकी ठेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वानी मतभेद बाजूला ठेवून काम केले पाहिजे, अशी सूचना केली. महापौर दत्तात्रय धनकवडे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालक मंत्री गिरीश बापट, उपमहापौर आबा बागुल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, महापालिकेचे सभागृह नेता शंकर केमसे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आदी या प्रसंगी उपस्थित होते.
पवार म्हणाले,की पुण्यात एखाद्या प्रश्नावर सांगोपांग चर्चा होते, तसा विरोधदेखील होतो. परंतु शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेताना एकत्र येऊन काम करण्याची पद्धत येथे आहे. राजकारणात विरोधक असतात. मात्र विरोधकांकडे शत्रू म्हणून पाहण्याची पद्धत योग्य नाही. मी पुण्यात घडलो. नानासाहेब गोरे, जयवंतराव टिळक, एस. एम. जोशी यांची भाषणे मी पुण्यात ऐकली. राजकारण आणि समाजकारणाचे धडे पुण्यात मिळाले. या शहरातून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली.
‘‘महाराष्ट्राची खडान्खडा माहिती असलेला नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे. पवार यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. मात्र राजकारणात असे होत असते, हे पवार यांचे मत आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व राजकीय पक्षांचे नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी घेतलेले निर्णय आणि शेतक ऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचा फायदा झाला. त्यांचे शिक्षण, कृषी, सहकार, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात योगदान आहे. चमक दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. त्यांची राजकीय दृष्टी सखोल आहे,’’ असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
बापट म्हणाले,की पवार यांचे देशात व परदेशात वेगळे स्थान आहे. कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी फळबागांविषयी घेतलेल्या निर्णयामुळे काही शेतकरीवर्ग श्रीमंत झाला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवल्या. राजकीय जीवनात विचारांची लढाई होते. पण सध्या वेगळी संस्कृती येऊ पाहात आहे. त्यामुळे राजकीय वातारवरण बिघडत आहे. प्रकाश जावडेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, सुनील तटकरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. महापौर धनकवडे यांनी प्रास्ताविक तर उपमहापौर बागुल यांनी आभार प्रदर्शन केले.

पवार राजकीय ‘शास्त्रज्ञ’
कार्यक्रमात शरद पवार यांनी केलेले कार्य, त्यांची राजकीय आणि सामाजिक जाण या विषयांवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनुभव सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. रामदास आठवले म्हणाले,की पवारांशी माझे संबंध बिघडलेले नाहीत. त्यांना दलितांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरप्रश्नी त्यांनी चांगले निर्णय घेतले. पवार हे ‘राजकीय शास्त्रज्ञ’ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानातील देश घडविण्याचे काम करत आहेत. जोपर्यंत ते संविधानाबरोबर आहेत तोपर्यंत आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. मी कधी कोणाच्या विरोधात बोलत नाही. कारण मला कधी कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. आठवले यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हंशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2016 3:30 am

Web Title: sharad pawar honoured by pmc
टॅग : Pmc
Next Stories
1 भाजपला हिटलर राज्य निर्माण करायचे आहे -सुशीलकुमार शिंदे
2 शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
3 पुण्याचा कचरा मोशीत टाकण्यास विरोध; ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
Just Now!
X