संमेलन उद्घाटनावेळी शरद पवार यांच्या साहित्यिकांना कानपिचक्या
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. मते मिळवणे हे आमचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी साहित्यिकांना कानपिचक्या दिल्या. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले साहित्यिक निवडणूक प्रक्रियेमुळे दूर राहिले आहेत, या वास्तवावर बोट ठेवत पवार यांनी माजी संमेलनाध्यक्षांनीच नव्या अध्यक्षांची निवड करावी, अशी सूचनाही केली. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही पवार यांनी या वेळी भाष्य केले. ते म्हणाले, ‘दुष्काळाने साहित्याला खूप काही दिले. तुकारामांचे अभंग, महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड, ह. ना. आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी ही त्याची उदाहरणे आहेत. आता शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ लेखक-कलाकारांवर आली आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून मदत केली आहे. या संमेलनाने दुष्काळात संमेलन घेताना शेतकऱ्यांचे स्मरण ठेवले. लेखणीच्या अंगी बळीराजाला झाकण्याचे बळ आले याचा आनंद आहे.’
दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा ओलांडल्या, पण साहित्याने भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना उपस्थित केला. वैश्विक साहित्य होण्याच्या सर्व गोष्टी मराठी साहित्यामध्ये आहेत. मराठी ज्ञानभाषा झाल्याखेरीज साहित्याचा ठसा वैश्विक पातळीवर उमटणार नाही. साहित्याचा मूळ विचार सोशल मीडियामधून गेला पाहिजे. साहित्यातून प्रश्न निर्माण केले जावेत. त्याची उत्तरेही साहित्यातूनच मिळाली पाहिजेत. नाही तर खूप विचार, पण कृतिशून्यता उपयोगाची नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह कवी गुलजार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, प्रतिभा राय, रहमान राही व सीताकांत महापात्र आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
सबनीस यांची माध्यमांवर टीका
प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात माध्यमांनाच लक्ष्य केले आणि प्रसारमाध्यमांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माझे काही चुकत असेल, तर जरूर चर्चा करा. संवादी सामर्थ्यांची बेरीज जमत नसेल तर मला आणि माझ्या भूमिकेला दोष देऊ नका, असेही ते म्हणाले.

सबनीस यांचे तारे..
* समाजातील निम्मे प्रश्न हे लंगिकतेशी संबंधित असून त्याविषयी कुणी बोलत नाही. या प्रश्नांमुळे महिलांची घुसमट होते
* व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकमुळे झकमारी वाढली आहे
* हे शब्द मागे घेऊन मी माफी मागतो नाहीतर उद्या माझी गाढवावरून धिड निघेल
* प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण करावे
* मी सदाशिव पेठेत जन्माला आलो असतो, तर कदाचित संघाच्या शाखेत गेलो असतो
’ परिवर्तनवादी विचारांचा असल्यामुळे ब्राह्मण असूनही कधी जानवे घातले नाही
* पुरोगामी आणि प्रतिगामी अशी लेखकांनीच आपल्यात फूट पाडून घेतली
* पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांबद्दल मला आदर आहे, पण ही कृती करण्यापूर्वी त्यांनी लेखणीतून संवाद साधला असता तर बरे झाले असते
* विद्रोही चळवळीच्या कार्यकर्त्यांशी माझे मतभेद आहेत, पण त्यांच्या निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही