वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विदर्भातील सामान्य माणसाचा पाठिंबा नाही. काही मुठभर श्रीमंत आणि अमराठी भाषकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय घेऊन निवडणूक लढवितो, तो क्वचितच जिंकतो. पण लोकांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी माझी भूमिका आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे, प्रा. जनार्दन वाघमारे आणि उल्हास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी पवार यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.  महाराष्ट्र संयुक्त राहण्याची भावना कमी होत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, वेगळया विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढणाऱया विदर्भवाद्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे बेळगावात मराठीचा मुद्दा घेऊन नेता निवडून येतो. यावरुन मराठी जनभावना काय आहे याचा अंदाज येतो. मराठी माणसाला महाराष्ट्रात एकजुटीने राहायचे आहे. त्याला लहान लहान वेगळी राज्ये नकोत.
राज्यात मराठी शाळांची संख्या कमी होत असल्याची खंत व्यक्त करताना मराठी भाषेच्या प्रसाराची सुरूवात आपल्या कुटुंबापासून करावी, असे मत पवार यांनी मराठी भाषेच्या प्रश्नावर व्यक्त केले. विकास हाच विदर्भ आणि मराठवाडय़ाचा मुख्य मुद्या आहे. या नैराशातूनच वेगळया राज्याची मागणी पुढे येत असते. त्यामुळे या भागातील जनतेच्या नैराशाची काळजी नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले.
मी अभ्यास सोडून बाकिच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचो. मी दहावीला असताना त्याकाळी प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले की सायकल मिळायची. मी तेच उद्दीष्ट ठेवले आणि ते पूर्ण केले.