राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गुरुवारी भाजपाकडून करण्यात आली होती. भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ठराव मांडून तशी मागणी करण्याचा प्रस्ताव मंजूर देखील करून घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपानं आपला रोख अनिल देशमुखांनंतर अजित पवार आणि अनिल परब यांच्याकडे वळवल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उलट चंद्रकांत पाटील यांनाच खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. त्यामुळे एकीकडे ईडीनं अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी केली असताना दुसरीकडे भाजपाच्या आरोपांवरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगाताना दिसत आहे.

नेमका काय केला भाजपानं ठराव?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे मार्च महिन्यात महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देखील पत्र लिहून काही गंभीर दावे केले होते. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल परब यांची सीबीआय चौकशी होऊ शकते, तर वाझेंच्या पत्रावर अजित पवार यांची सीबीआय चौकशी का होऊ शकत नाही? असं म्हणत या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!

चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ!

दरम्यान, या सर्व मुद्द्यावरून पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “सामान्य जीवनात अनेक राजकीय पक्षांची आम्ही पाहणी करत असतो. पण एखाद्या पक्षाच्या नेत्यासंबंधी ठराव करून अशी मागणी करण्याचं चित्र यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. पण चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या कधी पाहिल्या गेल्या नाहीत, अशा गोष्टी करण्यात त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं असेल, तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. सत्ता त्यांच्या हातात आहे. या चौकश्या करणाऱ्या यंत्रणा देखील आहेत. आमचे सगळे सहकारी त्यांचं स्वागत करतील”, असं शरद पवार म्हणाले.

मी फार वर्ष असले उद्योग केलेत!

पुण्यामध्ये नुकतंच अजित पवार यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आज माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. बिगर भाजपा आघाडीचं नेतृत्व शरद पवारांनी स्वीकारावं अशी चर्चा सुरू असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता देखील शरद पवार यांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली.

“मी फार वर्ष असले उद्योग केलेत”, बिगर भाजपा आघाडीच्या नेतेपदाबाबत पवारांची मिश्किल प्रतिक्रिया!

“आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही. पण सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या यामध्ये पडायचं नाही. त्यांना मार्गदर्शन करणं, शक्ती देणं, मदत करणं, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार”, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.