भांडवली गुंतवणुकीसह विविध सुधारणा व ग्राहकाभिमुख सेवांमुळे राज्याच्या वीजक्षेत्राची चांगली प्रगती झाली आहे. आता वीजक्षेत्रातील बदलते अर्थकारण व वीजग्राहकांच्या अपेक्षा यामध्ये समन्वय साधण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘महावितरण’च्या ‘प्रकाशभवन’ या नव्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार, महापौर चंचला कोद्रे, आमदार विनायक निम्हण, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, मुख्य अभियंता (स्थापत्य) चंद्रकांत वाघ, मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की राज्यात विजेची हानी एके काळी ३५ टक्के होती, ती सुमारे १४ टक्क्य़ांवर खाली आली. भांडवली गुंतवणुकीमुळे वीजयंत्रणा विस्तारली व सक्षम झाली. राज्याच्या ज्या भागात वीजबिलांच्या वसुलीअभावी वीजपुरवठा नियमित होत नाही, त्या भागामध्ये वीजबिले नियमित भरण्यासाठी ग्राहकांची मानसिकता निर्माण करावी. या ग्राहकांना चांगली सेवा दिली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाडेकर यांनी केले. बी. बी. थेटे यांनी सूत्रसंचालन केले.