शरद पवार यांचा भाजपवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय या संस्थांचा वापर केला जात आहे. राज्यातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांना धमकावून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे रविवारी केला. शिवेंद्रराजे, संग्राम जगताप, दिलीप सोपल यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असली तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते तसेच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, ‘विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी करण्यात येईल, असे त्यांना धमकाविले जात आहे. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर ‘ईडी’ने केलेली कारवाई हे त्याचे उदाहरण आहे. मात्र या कारवाईतून काहीच हाती लागले नाही. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पतीचीही चौकशी करण्यात येईल, असे त्यांना धमकाविण्यात आले. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर सुरू होत आहे. केवळ राज्यातच ही परिस्थिती नसून देशातील अनेक राज्यांत भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. राजकीय भूमिका वेगळी घेतली की यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर दबाव टाकला जातो. महाराष्ट्रातील राजकारणात असे चित्र यापूर्वी नव्हते. दबाव आणि सुडाचे राजकारण करण्यात येत असून या गोष्टीला तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत.’

पंढरपूरमधील कल्याण काळे यांचा साखर कारखाना अडचणीत होता. राज्य सरकारने नियम मोडून कारखान्याला ३० ते ३५ कोटी रुपये दिले. मात्र, त्यांसाठी त्यांना पक्षांतराची अट घालण्यात आली. संस्था टिकण्यासाठी त्यांनीही पक्षांतर केले, असे पवार यांनी सांगितले.

साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, दिलीप सोपल, संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत, असे बोलले जात आहे. मात्र कोणीही पक्ष सोडणार नाही, असे पवार म्हणाले. शिवेंद्रराजे भोसले यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही पक्षाबरोबरच असल्याचे स्पष्ट केले आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढय़ाचे आमदार बबन शिंदे हेही पक्षातच राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे पवार म्हणाले. मतपत्रिकेवर निवडणुका न झाल्यास बहिष्कार टाकण्याची मनसेची भूमिका मान्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यातील २४० जागांवर चर्चा झाली असून, घटक पक्षांसोबत लवकरच चर्चा करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.