राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पक्षांतरावर शरद पवार यांचे भाष्य

पक्षातील आमदार सोडून गेले तरी त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. यापूर्वी मी सहाचे साठ आमदार करून दाखविले होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पक्षांतरावर भाष्य केले. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या घडामोडींवर मत व्यक्त केले.

पवार म्हणाले, १९८० च्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले होते. त्या वेळी १५ दिवसांसाठी मी परदेशात गेलो असताना काही मंडळींनी सत्तेचे आमिष दाखवून आमदार फोडले होते. मी परतलो तेव्हा माझ्याबरोबर केवळ सहा आमदार होते. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. आमदार बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढय़ाच उत्साहात पुढे येत आहेत. यानिमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल.  सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षांतर होत आहे, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी आजवर कधीही पाहिलेले नाही, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘भाजपचे दोन आमदार संपर्कात’

भाकड गाईच सत्ताधारी पक्षात जात असल्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला. शिवसेना आणि भाजपचे दोन आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगले वातावरण असून राज्यात आमची सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.