कोणताही नवीन प्रकल्प आला की दुसरीकडे त्याला विरोध करणारी समितीही तयार होते. राज्यातील २६ ठिकाणे लवासासारखेच पर्यटकांचे केंद्र म्हणून विकसित करता येतील. परंतु त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे,’असे मत व्यक्त करीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘प्रसारमाध्यमांनी विकासप्रक्रिया गांभीर्याने घेऊन विकासविरोधी घटकांना प्रसिद्धी देऊ नये,’असा सल्लाही दिला.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’ला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘असोचेम’ या संस्थेचे अध्यक्ष राणा कपूर यांना पवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. एमसीसीआयएचे अध्यक्ष एस. के. जैन, महासंचालक अनंत सरदेशमुख, महापौर चंचला कोद्रे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्राच्या- विशेषत: सह्य़ाद्रीच्या रांगांमधील अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या भागातून लोकसंख्येचे दुसरीकडे स्थलांतर झाले आहे. पण तिथे पाणी आहे, भरपूर टेकडय़ाही आहेत. मग इंग्लंडच्या धर्तीवर या ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास का होऊ नये? लवासा हे असेच एक उदाहरण आहे. लवासात भूसंपादनाचा कोणताही प्रश्न नसतानाही काही लोकांनी लवासाच्या विरोधात एक समिती स्थापन केली. यात ३ ते ४ वर्षे गेली. परंतु आज लवासा पर्यटकांचे केंद्र झाले असून, दर शनिवार-रविवारी लाखो लोक लवासाला भेट देतात. तिथे उत्तम शाळा आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालयेही आहेत. राज्यात लवासासारख्या २६ जागा आहेत. या ठिकाणी लोकसंख्या नगण्य असून, भरपूर पाणी आहे. या जागाही पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येतील. पण यासाठी आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. विशेषत: प्रसारमाध्यमांनी विकासाची ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन विकासविरोधी घटकांना प्रसिद्धी देता कामा नये.”
पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतही पवार यांनी हाच मुद्दा मांडला. ते म्हणाले, “गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु जेव्हा सरकार एखादी जागा निश्चित करते तेव्हा काही लोक त्याला विरोध करून भूसंपादनाच्या कामात अडथळे आणतात.”