देशाच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने तरुणांसाठी सुरु केलेल्या कौशल्य विकास योजनेवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टीका केली आहे. मोदींनी दिल्लीमध्ये कौशल्य विकास योजनेचे भाषण केले. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय देखील सुरू केले. मात्र, या योजनेतून केवळ ८ टक्के विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाले. याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे पवार यावेळी म्हणाले. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, देशात महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांच्या पुढे असून काम मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी अर्ज करून नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पाहण्यास मिळते.प्रत्येक क्षेत्रात सध्याची तरुण पिढी नाविन्यपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जागतिक पातळीवर भारताचे स्थान शंभरावे आहे. आपण किती मागे आहोत हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. यावर विशेष काम करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पुढील काळात नव्या पिढीला तंत्र शिक्षण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक महाविद्यालये काढली मात्र कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मविश्वास असणारी पिढी निर्माण करण्यात अपयशी ठरलो, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.