08 March 2021

News Flash

सही करताना लोकांचा हात लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो! – शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

आजच्या प्रशासनातील लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली.

| September 11, 2013 02:50 am

‘‘आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे काम समजून त्यावर वेळेत निर्णय घेणे आवश्यक असते. विलासराव देशमुख यांच्याकडे हा गुण होता. आजच्या प्रशासनातील लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो. कामे मार्गी लागण्यासाठी फायलींवर महिनोंमहिने सहीच होत नसल्याचे दिसते. बरोबर जायचे आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली.
माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावरील ‘आठवणीतले विलासराव’ या पुस्तकाचे मंगळवारी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, प्रकाशक नरेंद्र व्यवहारे या वेळी उपस्थित होते.
राजकीय पाश्र्वभूमी आणि कुणाचाही वरदहस्त नसलेल्या व्यक्तीने सरपंच ते केंद्रीय मंत्री असा केलेला प्रवास सोपा नसल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी झटणारा केवळ मुख्यमंत्री नसतो, तो राज्याचा नेता असतो. राज्याचा नेता होण्याची व्यापक दृष्टी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती. आजच्या काळात विलासराव देशमुख यांच्याकडे ती दृष्टी दिसली. राजकारणात आमदार, खासदार आणि मंत्री होणे एवढेच महत्त्वाचे नसते. ज्या परिसरातील लोकांनी आपल्याला इथवर पोहोचवले त्यांच्या जीवनात आपण काही बदल करू शकतो का हे पाहायला हवे. आज सहकारी संस्था नेटक्या पद्धतीने चालत नाहीत. पण कारखानदारी आणि शेतीही चांगल्या पद्धतीने कशी करावी हे विलासरावांनी दाखवून दिले. तरुण पिढीची लोकसंख्या मोठी आहे. परंतु तिचे जनसंपत्तीत रूपांतर होणे गरजेचे आहे. उत्तम शिक्षणानेच माणसे तयार होतील याकडेही विलासरावांचे लक्ष होते. माणूस घडवणे हीच नेतृत्वाची जबाबदारी असते. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीच्या कामाबाबत वेळेत निर्णय घेणे आवश्यक असते. विलासरावांकडे हा गुण होता. आजच्या प्रशासनातील लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो. कामे मार्गी लागण्यासाठी फायलींवर महिनोंमहिने सहीच होत नसल्याचे दिसते.’’
तरुणांमधून विलासराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व घडावे यासाठी त्यांच्या नावाने सर्वागीण विकास केंद्र उभारण्याचा मनोदय हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवला.
पुस्तकाबद्दल पवारांची नाराजी!
प्रकाशित झालेल्या पुस्तकासंबंधी बोलताना पवार यांनी पुस्तकाने विलासराव देशमुख यांना न्याय दिलेला नसल्याचे मत व्यक्त केले. ‘पुस्तकात अधिक सविस्तर लेखन होणे आवश्यक होते. विलासरावांची पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे तयार झाले याची नोंद घेतली गेली, तर ते तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:50 am

Web Title: sharad pawar targets cm
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडू गायकवाड
2 माझे हात लांब आहेत.. कलमाडी यांचे सूचक विधान
3 मुलावर चाकूचे वार करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X