दिल्लीत काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आता हे आंदोलन उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पाच वेळा बैठक होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. कायदे रद्द करण्याबरोबरच हमीभावाची हमी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हा विषय मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामध्ये अनुभवी शरद पवार यांचादेखील समावेश असणा आहे. याबाबत तुमचं मत काय? याचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी अतिशय संयमी शब्दात दिले. “राष्ट्रपतींच्या भेटीसाठी जे-जे लोक जाणार आहेत, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही कधीही राष्ट्रपतींची भेट घेऊ शकते. ते भेट घेत असतील तर त्यांच स्वागतच आहे”, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

कायदा रद्द करण्याच्या मागणीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

“मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात फक्त बदल केला जाईल. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यात नव्याने कोणताही मोठा बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते, तेच कायम असून फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली आहे. अगोदर ही पद्धत अस्तित्वात नव्हती. प्रश्न फक्त MSPचा होता. पण त्याबाबत केंद्र सरकार पेपरवर MSPची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार असं म्हणणं निरर्थक आहे. केंद्र सरकारने केलेला हा कायदा रद्द होणार नाही”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.