महिलांवरील अत्याचार हे सर्व आता बोलण्याच्या पलीकडे गेलं आहे. मनस्ताप होतो, डोकं सटकतं. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते. महाराजांनी जे कायदे लागू केले होते, ते आता पुन्हा लागू करण्याची गरज आहे, अशा शब्दांत अभिनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी महिलांवरील अत्याचार आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.

हैदराबाद पोलिसांचं कौतुक करत ते म्हणाले, “हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते उत्तम केलं. निर्भयाप्रकरणी दोषींना सोडा म्हणून विनंती करण्यात येत आहे. दोषींची फाशी रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. अशा लोकांसमोर आपण काय बोलणार? महिलांच्या अत्याचारावरील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींच्या मनात दहशत निर्माण झाली पाहिजे.”

हिंगणघाट घटनेचा निषेध व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “एखाद्या स्त्रीकडे पाहून वेगळा विचार आल्यास कठोर शिक्षा त्या व्यक्तीला आठवली पाहिजे इतकी दहशत हवी. तेव्हाच या घटनांना आळा बसेल. नाहीतर यात काही बदल होणार नाही.”