16 December 2017

News Flash

स्त्री-पुरुष भेदाला छेद देणारी लिंगविरहित भाषा उदयाला येईल

‘मी तुमच्या भाषेत बोलते, तुमच्यासारखी वागते. म्हणून तुम्हाला आपलीशी वाटते,

प्रतिनिधी, पुणे | Updated: March 21, 2017 4:44 AM

तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवयित्री दिशा शेख

मराठी साहित्यामध्ये अद्यापही लिंगविरहित भाषा जन्माला आलेली नाही. स्त्री-पुरुष भेदाला छेद देत समानता प्रस्थापित करणारे लेखन झाल्यास नवी समांतर भाषा उदयाला येईल, असा विश्वास तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केला. षंढ असणं वाईट आहे का? की तो केवळ एक दोष आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘शब्दवेडी दिशा’ अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां-कवयित्री दिशा शेख यांचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह रसिकांच्या अमाप गर्दीने ओसंडून वाहत होते. वेदना आणि हुंकार यांनी भरलेले तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडत समाजव्यवस्थेवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या काव्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. वुमनविश्व डेलीहंट आणि पुणे पोस्ट यांच्यातर्फे आयोजित ‘कथा-व्यथा बहुलिंगी जगण्याच्या’ या कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमात शर्मिष्ठा भोसले यांनी कवयित्री दिशा शेख यांच्याशी संवाद साधला.

‘मी तुमच्या भाषेत बोलते, तुमच्यासारखी वागते. म्हणून तुम्हाला आपलीशी वाटते, अन्यथा मला कोणीही विचारलं नसतं. स्त्रीला ममत्व, देवीत्व, सदाचाराचा शिक्का चिकटवून बंधने घातली जातात. मी तृतीयपंथी असल्याचा त्रास होत नाही, तर बाईसारखे असण्याचा त्रास होतो. माझे प्रश्न मुळात महिलांच्या प्रश्नांपासूनच सुरू होतात’, असे दिशा शेख यांनी सांगितले. ‘विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था ही शोषक व्यवस्था आहे. तृतीयपंथीयांनी व्यवस्थेची बंधनं झुगारुन स्वत:चं अस्तित्व सिद्ध केले आहे. आता पुन्हा कुटुंबव्यवस्थेच्या इच्छेने उलटा प्रवास कशाला करायचा? विद्रोही चळवळ उभी करणारी तृतीयपंथी ही पहिली संघटना आहे. कोणतीही भाषा चुकीची किंवा बरोबर नसते. केवळ शिव्या देणे हे व्यवस्थेला लाथाडण्याचे लक्षण आहे. ती आमची अभिव्यक्ती आहे’, असेही त्यांनी नमूद केले. हिजडा, षंढ अशा शिव्या आम्हाला दिल्या जातात. केवळ मूल जन्माला घालता आलं नाही तरी बाकी आयुष्य सामान्य माणसासारखं जगता येतं. आम्ही व्यवस्थेच्या फायद्याचे नाहीत. म्हणूनच आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न देण्याचा बंदोबस्त व्यवस्थेनेच केला आहे. षंढ असणं वाईट आहे का? की तो केवळ एक दोष आहे’, असा मार्मिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

साहित्य निर्मितीबाबत बोलताना दिशा शेख म्हणाल्या, की माझ्या लेखी शब्द म्हणजे वेदनेची अभिव्यक्ती करताना खांदा टेकवण्याचं साधन आहे. आजवर तृतीयपंथीयांबाबत केवळ परिघाबाहेर राहून लेखन केले गेले. मात्र, आमचे वास्तव मांडण्याच्या उद्देशातून मी लेखन करू लागले. या लेखन प्रवासातच माझ्यातील कविता जन्माला येते. मी पुस्तक नव्हे, तर माणसांना वाचते. या वेळी दिशा शेख यांनी काही कवितांचे सादरीकरण केले.

First Published on March 21, 2017 2:26 am

Web Title: sharmishtha bhosle communicate with poet disha sheikh