करोना विषाणूंच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहेत. मात्र, कर्तव्यावर असतानाही डॉक्टर, नर्स आणि पोलिसांवर अनेक ठिकाणी नागरिकांकडून हल्ले झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, तरीही न डगमगता देश संकटात असताना या योद्ध्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. पुण्यातही एका महिला पोलीस अधिकाऱ्याला असाच अनुभव आला. नाकाबंदीदरम्यान त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मोकाट फिरणाऱ्या एका उनाड दुचाकीस्वाराला अडवताना त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली.

पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर या नाकाबंदीदरम्यान वाहन चालकांची चौकशी करीत होत्या. यावेळी त्यांनी वेगात निघालेल्या एका दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपली दुचाकी न थांबवताना जोरात धक्का देऊन तो पसार झाला. या घटनेत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळं त्यांना आपल्या हाताला बँडेज बांधून कर्तव्यावर लगेचच रुजू व्हावं लागलं.

“करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार वाहतूक नियमनाचे काम चालू आहे. या आदेशानुसार, रामटेकडी चौकात नाकाबंदीदरम्यान येणार्‍या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. काल दुपारच्या सुमारास दुचाकीवरून दोघे जण भरधाव येत असल्याचे आमच्या कर्मचार्‍यांना दिसले. त्यानंतर या दुचाकी चालकाला थांबविण्याचा दोन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांना देखील न जुमानता त्याने आपली दुचाकी पुढे दामटली. मी पुढच्या बाजूला वाहनांची तपासणी करीत असल्याने मला कर्मचाऱ्यांनी आवाज दिला. त्यामुळे मी ती दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला. तर मला देखील तो जोरात धडक देऊन वेगाने पुढे निघून गेला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या दोघांचा पुढे जाऊन शोध घेतला. मात्र, तोवर दोघेजण पसार झाले होते. या घटनेत माझ्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. जवळच्या रूग्णालयात जाऊन यावर मी उपचार घेतले, यावेळी डाव्या हाताच्या पंजाला संपूर्ण बँडेज करावं लागलं. सध्या आपत्कालिन परिस्थिती असल्यानं सुट्टी न घेता लगेचच कर्तव्यावर हजर रहावं लागणार होतं,” अशा शब्दांत आपल्यावर ओढवलेला प्रसंग उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांनी कथन केला.

“सध्याच्या संकटसमयी हाताला दुखापत झाली असली, तरी मी आणि माझे सर्व सहकारी करोना विषाणूला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मात्र, त्या अगोदर प्रत्येक नागरिकाने प्रशासनाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करावं, नागरिकांनी घरी बसावं असं,” आवाहन देखील त्यांनी केलं. हाताला दुखापत होऊन देखील दुसऱ्याच क्षणी कर्तव्यावर हजर झालेल्या या महिला पोलीस अधिकाऱ्याला सलाम.