आजचं पुणं नव्या तंत्रज्ञानाच्या शतकाकडे निघालंय, पण तरीही एखाद्या सकाळी बिल्डिंगच्या दाराशी ‘देव पावला’ म्हणत मोरपीस लावलेला ‘वासुदेव’ येऊन थबकतो. त्याच्याकडे पाहिलं, की मी माझ्याच मनात हरवलेल्या पुण्यात, लहानपणच्या वाडय़ाच्या दिवसांत जाऊन पोहोचतो..
माझ्या डोळय़ांसमोर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचं आमच्या शाळा-कॉलेजच्या काळातलं पुणं उभं राहतं. भरभक्कम दिंडी दरवाजांच्या वाडय़ांचं पुणं, वाडासंस्कृतीत एकत्र कुटुंबातल्यासारखी एकोप्यानं नांदणारी असंख्य बिऱ्हाडं. पापड-कुरडयांची वाळवणं मागल्या दारच्या अंगणात पसरलेली. वाडय़ाच्या पुढच्या बाजूला असलेल्या उघडय़ावर अंघोळी करण्याचा न्हाणी चौक. मागील दारी एखादं केळी-नारळाचं झाड. उन्हाळय़ाच्या सुटीत मागच्या अंगणात पत्ते-कॅरम खेळत बसलेली वाडय़ातली आम्ही तरुण पोरं. गप्पा संपेपर्यंत उत्तररात्र झालेली. आपापल्या सतरंज्यांवर डोकं टेकत असताना वरच्या नारळाच्या झाडाच्या टोकाकडे लक्ष जायचं. कुणीतरी म्हणायचं, की ‘नारळ कधी अंगावर पडत नाही.’ या वाक्यावर विसंबेतो गाढ झोप लागायची. बऱ्याच वाडय़ांत परसदारी विहीरही असायची. शनिवारच्या दुपारी शाळेतून घरी आल्यावर रहाटानं पाणी ओढून आठवडय़ाचे कपडे धुतले जायचे आणि तांब्यामध्ये विस्तव घालून तो तांब्या गादीवरच्या शर्ट-पँटवर फिरवत इस्त्री केली जायची. उंदराच्या पिंजऱ्यांना भाजकं खोबरं लावून उंदीर पकडण्याच्या उद्योगातही काहीजण मग्न असत. पावसाळय़ाच्या दिवसांत फरश्यांवरची ‘गांडुळं’ खराटय़ाच्या काडीनं उचलण्याचा उद्योगही रंगात येत असे. घरातल्या जेवणात आवडीची भाजी नसेल तर कुणाचीही परवानगी न घेता कुणीही कुणाच्याही घरात जाऊन जेवत असे. रविवारची सकाळ बऱ्याचदा मोड आलेले ‘वाल’ पाटांवर पसरवून ‘बिरडय़ा’ सोलण्यात संपत असे. दिवाळीत सहामाहीचा शेवटचा पेपर टाकताक्षणी बादल्या घेऊन माती आणण्यासाठी धावणं होई. चटकन उगवणारा ‘अळीव’ मातीच्या ढिगावर पेरून उभारलेल्या किल्ल्यावर शिवाजीमहाराजांना स्थापन केलं जाई. या किल्ल्याच्या पायथ्याशी किल्लीवर चालणारी किंवा पडद्याआडून दोरीनं ओढली जाणारी ‘आगगाडी’ असे. शिवाजीच्या काळात आगगाडी कुठे होती, हा प्रश्न किल्ले उभारणीत मग्न असलेल्यांना पडत नसे. कधीकधी ‘अळिवा’ला पाणी घालता घालता किल्ल्यावरच्या शिपायांचे हात-पाय तुटत.
दिवाळीत पहिला फटाका कुणी फोडायचा याचे बेत आखले जात आणि फॅमिली शिंप्यानं आदल्या रात्री उशिरानं दिलेल्या शर्टाच्या काज्यातून सकाळी गुंडी जाता जाता कुणीतरी आपल्याआधीच फटाका फोडून टाकत असे.
पावसाळय़ाच्या दिवसांत या जुन्या वाडय़ातून मातीच्या भिंती असलेल्या जुन्या छतांमधून ठिकठिकाणी गळणारं पाणी साठवण्यासाठी ‘पातेली’ लावत बसण्यात वेळ जात असे. वाडय़ात कुणाचं लग्न असेल तर परसदारच्या अंगणात आचाऱ्यांच्या शेगडय़ा लागत आणि फराळाचे जिन्नस किंवा जिलब्या-लाडू करण्यासाठी पंचातच वावरणारे, घामाने निथळलेले, बोटांतल्या बिडीचा झुरका घेत कढईत तेल ओतणाऱ्या आचाऱ्यांची झुंबड उडे.
त्या काळी फक्त ‘फॅमिली’ डॉक्टरच होते असं नाही, तर आचारी, शिंपी, सोनार, किराणामालवाले, भाजीवाला सगळेच फॅमिलीचे ठरलेले असत. फक्त दिवाळीला नवा कपडा मिळे. मनात येईल तेव्हा बारमाही केव्हाही नवा कपडा, तोही रेडिमेड घेण्याचा प्रघात तेव्हा नव्हता.
रस्त्यावरचे फेरीवालेही ठराविक होते. त्यांच्या आगमनावरून घडय़ाळ न बघताही ‘वेळ’ सांगता येत होती.
अगदी प्रात:काळी ‘देव पावला’ म्हणत मोराच्या पिसाची टोपी घातलेला ‘वासुदेव’ चिपळय़ा वाजवत दारापुढे थबके. पाठोपाठ अनाथ विद्यार्थिगृहाचे ‘ॐ भवति भिक्षांदेही’ एवढंच म्हणून गप्प वाट पाहणारे माधुकरे येत. क्वचित पांढरं भस्म लावलेले पांढऱ्या लुंगीतले ‘आई ब्रह्मणो दक्षिणाऽ’ म्हणत उभे ठाकणारे मद्रासी ब्राह्मण असत. त्यानंतर ‘हरभराऽऽ मूऽऽग, मटकी मोऽडाऽऽची’ म्हणत गाडी पोटानं ढकलत जाणारा कडधान्यवाला रविवारी सकाळी साडेनवाच्या आसपास आरोळी देत असे. कल्हईवाला दुपारच्या दरम्यान येऊन वाडय़ाच्या दारात विस्तव पेटवे. तांबडय़ा पिवळय़ा गोळय़ांच्या बर्फवाल्यांची घंटा दुपारी दोनच्या दरम्यान ऐकायला येई. पाठोपाठ ‘तांब्ये पितळय़ेची ‘मोऽऽ?ड’ची ललकारी असे. तिन्ही सांजेला, उन्हं उतरणीच्या वेळेला गळय़ात पिशवी अडकवलेला ‘च्य-च्य’ असा आवाज करत काकडी फुगे विकणारा फुगेवाला भेटे. छोटय़ा छोटय़ा बोळवजा गल्ल्यांमधल्या (त्याला आळी म्हणत.) रस्त्यावर उन्हाळी सुटीच्या रात्री मजा येत असे. वाडय़ावाडय़ांच्या दारात पट्टय़ापट्टय़ांच्या लेंग्यात किंवा अध्र्या चड्डय़ांत बसून ‘सायकली’ शिकणाऱ्यांना उत्तेजन दिलं जाई. सीटचा आधार दिल्याचं दाखवत दाखवत कधी हात सोडलेला असे ते नव्यानं सायकल शिकणाऱ्या पोराला सायकलची चेन पायात येऊन पडेपर्यंत कळत नसे.
बाजीराव रस्त्यावरसुद्धा शनिपाराजवळच्या दुकानातून एका बाजूनं समोरच्या दुकानात निवांत बोलता येत असे. आता रस्ता क्रॉस करायला अर्धा तास लागणाऱ्यांना याची कल्पना येणार नाही. कोल्ड्रिंक हाऊस, पानाचे ढेले किंवा खानावळींसाठी बर्फ घेऊन जाणारे बर्फाचे गाडे हा तर कसरतीचा खेळ असे. पुढच्या बाजूला बसून बैलाला चाबूक मारण्यात दंग असलेल्या बर्फवाल्याचा डोळा चुकवून गाडय़ाला लोंबकळत बर्फाचा तुकडा पळवण्याची स्पर्धा लागे. गाडीवानाच्या लक्षात आलं तर पुढच्या बैलावर मारला जाणारा चाबूक मागच्या पोरांच्या दिशेनं वळे. मग गाडा सोडून खिदळताना धडपडायला होई. बरोब्बर शाळेत जायच्या टायमाला गटार उपसणारी केशरी रंगाची इंजिनं घराघरांसमोरच्या ड्रेनेजची झाकणं उघडून गळ टाकून बसत. त्या भोकातून वर येणारी झुरळं पाहण्यात रमलेल्या पोरांना ‘शाळेला उशीर होतोय, पळा’ म्हणत पाठीवर घरातल्या कुणाचा तरी धपाटा बसे.
तिन्ही सांजेला या गल्ल्यांमधल्या रस्त्यांवर चाळीसचे मिणमिणते बल्ब होते. व्होल्टेज कमी होऊन त्यांचा उजेड आणखी आक्रसत असे. त्या रस्त्यांवर लख्ख उजेड फक्त दोनच कारणांनी पडे. ‘वरात’ जात असेल तर मिरवणुकीच्या दुतर्फा चालणाऱ्या बत्त्यांचा किंवा ‘राम बोलो भई राम’ असा अस्पष्ट स्वर निघत जाणाऱ्या खांद्यावरच्या प्रेतयात्रांबरोबरच्या दिव्यांचा.
बाकी साडेसातनंतर काळोख आणि सामसूमच. नाकात नथ, कपाळ लाल कुंकवाच्या मळवटानं भरलेलं, घाम निथळत असलेला, घागरी फुंकत नऊवारीतल्या बायका नवरात्रीतल्या अष्टमीला ‘फूऽऽफूऽऽ’ असा आवाज करत रस्त्यावरून झुंडीनं जात तेव्हा ते दृश्य काहीसं गूढ वाटत असे. तर प्रात:काळी डोईवर एखादं फूल लेऊन, हाती सतरंजीचा तुकडा आणि पोथी घेऊन लगबगीनं देवळांकडे प्रवचन-काकड आरतीला जाणाऱ्या नऊवारीतल्या सासवा-आज्या पाहून मन उल्हसित होत असे, प्रसन्न वाटत असे. नाकावर हळदीकुंकू सांडलेल्या, लगबगीनं चाललेल्या त्या बायकांना देवळात प्रवचनकाराच्या पुढय़ात सतरंजीचा तुकडा टाकण्याची घाई असे. वाडय़ाच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीपर्यंत टोकाची टोपी पोहोचणारा, उंच कृत्रिम लांब पायांचा विदूषक पाहणं गमतीचा भाग असे. पाऊल टाकताना तो पडेल की काय, या भीतीनं तो विक्री करत असलेली वस्तू विसरायला होई. हातगाडीवर पोस्टर्सची डोंगरासारखी कमान केलेली गाडी जाताना कण्र्यावरून सांगण्यापूर्वीच पोस्टरवरून नव्या येणाऱ्या सिनेमांची चाहूल लागे.
गल्लीतल्या एखाद्यानं घेतलेली ‘गाडी’ हा अप्रूपाचा, म्हणूनच चर्चेचा विषय असे. स्कूटरसाठी नंबर लावणं हाही श्रीमंतीचा भाग असे. कलरफुल-गुबगुबीत ‘सीट’ हादेखील सायकलींच्या राज्यात आवर्जून बघण्याचा विषय.
ताजे पेरू, हरभरा, चिकू, केळी, आंबेसुद्धा गल्लीत दारोदारी येत. तेव्हा त्यांचे आजसारखे स्टॉल्स नव्हते.
‘एका साडीच्या बदल्यात अमुकच आकाराचं भांडं दे’ हा घासाघाशीचा खेळ दारोदारी चाले. ‘आघाडा-दूर्वा फुलीऽऽय’वाली भिजत्या पावसात सकाळी सकाळी आली, की ‘श्रावण’ सुरू झाल्याचं कळे. ‘फणेऽऽनाग’ म्हणत टोपल्या उलगडणाऱ्यांवरून ‘नागपंचमी’ असल्याची जाणीव होई. ‘सुट्टे गिऱ्हान’च्या आरोळय़ांनी आज ‘ग्रहण’ असल्याचं कळत असे.
संध्याकाळच्या अशा सीझनल फेरीवाल्यांच्या आवाजांखेरीज बारमाही दर बुधवारी रात्री आठ वाजता वाडय़ावाडय़ांतून रेडिओ व्हॉल्यूम जरा मोठ्ठा असेल तर एकच आवाज कानी येई..
‘हप्ताभरके सबसे लोकप्रिय गीत सुननेवाले भाईयों और बहनों अमीन सयानी का नमश्कार!’ दुपारच्या वेळी ‘कामगार सभा’ किंवा ‘गृहिणी’. रात्री श्रुतिका आणि काही वाडय़ांवरून जाताना दुपारी चारच्या दरम्यान येणारा पेटीचा आवाज आणि पाठोपाठ ‘साऽरेऽगऽमऽ’ कोरसमध्ये म्हणणाऱ्यांचा. गाण्याच्या क्लासला जाणं हे लग्नाळू मुलीचं विशेष क्वालिफिकेशन होतं.
आमच्या दृष्टीनं शहराचा आवाका तसा छोटा होता. ओंकारेश्वर ते टिळक रोड आणि अलका टॉकीज ते सोन्या मारुती चौक. शनवार, नारायण, सदाशिव पेठ असा ब्राह्मणी वळणाचा हा भाग. शिवाजी रोडपलीकडे प्रामुख्यानं मिश्र वस्ती होती. माझ्या आठवणीनुसार बाजीराव रोड जिथं संपत होता तिथं अभिनवच्या चौकात मध्यावर मोठ्ठं झाड होतं. गणपतीला पेशवे पार्कच्या बाजूनं तळय़ातून उतरून जावं लागे. जिमखाना, कॅम्प हे अप्रूपाचे भाग होते. हिंगण्यात महिलाश्रमात जाताना नळ स्टॉपच्या चौकापुढे काही नव्हतं. तिकडे गेलेला टांगा पाचपूर्वी परतत असे. नळ स्टॉप चौकातही मोठ्ठं झाड होतं. इकडे झाशीच्या राणीचा पुतळा बालगंधर्व मंदिराच्या आवारात होता. त्याही आधी बालगंधर्व थिएटरच्या जागी धोबी घाट होता. ८० फुटी रस्ता म्हणून जंगलीमहाराज रस्त्याचं कौतुक होत. ऐसपैस बंगल्यांनी नटलेला जिमखाना होता. उत्तररात्री कलावंत-राजकारण्यांना नॉनव्हेज खाण्यासाठी ‘गुडलक’मध्ये जाणं हा प्रेस्टीजचा भाग वाटे. बाकीच्या सामान्यांसाठी रात्रभर उघडा असणारा बिनदाराचा एकमेव खादाडी ठेला होता- खन्नांचं हॉटेल.
चवीनं खाणं, बिनतोड बोलणं, मैफलीत गाणं ऐकणं ही पुणेकरांची आनंदनिधानं होती. खाणं खाण्यासाठी हॉटेलात जाणं फार नव्हतं. घरीच एकत्र कुटुंबात स्वयंपाकाला सरावलेल्या बायका चवीनं चार वेगळे पदार्थ करत. तरीही डेक्कनवर ‘अप्पा’ची खिचडी-काकडी, गणपती चौकातलं पुणे आरोग्य मंदिर, टिळक रोडवरच्या ‘जीवन रेस्टॉरंट’ची आंबोळी, लॉ कॉलेजसमोरच्या बेचक्यातली करंदीकर मिसळ, आऊताईंच्या ‘प्रभा’मधला वडा, ‘जनसेवा’चा ‘खरवस’ अशा घरगुती वळणाच्या पदार्थानाच घराबाहेरच्या हॉटेलांमध्ये प्राधान्य होतं.
लग्न-मुंजीत पाटावरच्या पंगती होत्या आणि पैजेनं अख्खी परात जिलबी संपवणाऱ्या खवय्यांचे गट होते. आता फग्र्युसन-जंगलीमहाराज रोडवर चाळीस-पन्नास रेस्टॉरंट झालीयत नि ती सर्व ‘फुल्ल’ असतात. साधं वरण-भात-आळूची भाजी इथपासून ‘थाई’ फूडपर्यंत मेनूचं वैविध्य आता पुण्यात आलंय. खाण्याप्रमाणे ‘गाणं’ ऐकणं-शिकणं-म्हणणं या साऱ्यांत रस असणारे पुणेकर तेव्हा होते. गजाननराव वाटवे-हिराबाई-ज्योत्स्नाबाई यांच्या मैफली रस्त्यावर रंगत होत्या. गाणं ऐकण्यासाठी गणपतीत निंबाळकर तालीम ते वज्रदेही चौकापर्यंत रस्त्यावर श्रोत्यांची दाटी होई. ‘सवाई गंधर्व’च्या निमित्तानं ‘गाणं’ जागतं ठेवलं होतं. त्याचे अजूनपर्यंत स्पेशल शो झाले नव्हते. गाणं-खाणं याप्रमाणे ‘बोलणं’ही चवीचं होतं. तेव्हा पुणेरी बोलण्यावर चवीनं चर्चा होई. ‘वसंत व्याख्यानमाला’ हे बोलणाऱ्यांसाठी मानाचं व्यासपीठ होतं. साहित्य परिषदेच्या छोटय़ा हॉलमध्ये भाषण ऐकायला पुस्तकं वाचणारे श्रोते येत. त्यामुळे भाषण संपल्यावर त्याच्या मुद्यांचं खंडन करणारे प्रश्न विचारले जात. दत्तो वामन पोतदारांपासून डॉ. रा. शं. वाळिंब्यांपर्यंत वक्तृत्वाच्या विविध छटा अनुभवायला मिळत. भरत नाटय़ मंदिर (म्हणजे तेव्हाचं ‘सोशल क्लब’) मध्ये ना. सी. फडक्यांनी संगीत नाटककारांवर केलेली अभ्यासपूर्ण भाषणं माझ्या आजही लक्षात आहेत. आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, नाथ पै, ना. ग. गोरे, पु. ल., यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दांचं वैभव न्यू इंग्लिश स्कूल पटांगणापासून शनिवारवाडय़ापर्यंत ऐकायला मिळे. प्र. बा. जोगांसारखा एखादा वक्ता स्वत:च्या अॅम्बेसडर गाडीच्या टपावर बसून गल्लोगल्लीच्या कोपऱ्यावर गाडी थांबवून भाषणांची हौस भागवून घेत असे. ‘गोखले हॉल’ हा कपडेविक्री सेंटर झाला नव्हता. तिथंही वाक् युद्ध अनुभवण्याची मजा होती. नूमविच्या पटांगणात बाबूजींच्या गद्य वक्तव्यांसह सादर होणारं ‘गीतरामायण’ जसं ऐकायला मिळे तसंच बाळशास्त्री हरदाससारख्यांची प्रवचनंही ऐकायला मिळत.
वेदशास्त्रोत्तेजक सभा, भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर अशासारख्या संस्थाही अभ्यासासाठी आयुष्य वेचणाऱ्या अभ्यासक-पंडितांची केंद्रं होती. मूलभूत शिकणं नि शिकवणं हा पुणेरी पगडीचा ‘कणा’ होता. आमच्या आधीच्या पिढीनं अत्रे-भावे- माटे-फडके वाद ऐकले. आमचं भाग्य, की आमच्या उमेदवारीकाळात आम्हाला ‘अत्रे-फडके-पुलं’ तरी ऐकता आले. या शब्दप्रभूंवरून आठवलं, की ‘पुणेरी पाटय़ा’ (ज्या अद्याप तरी चुणूक दाखवतात.) हा खास मनोरंजनाचाच भाग होता. ‘आपणास गरम पदार्थ हवा ना, मग उशीर होतो म्हणून काय विचारता?’ असा रोखठोक सवाल पुणेरी दुकानदार(च) पाटीतून विचारत. ‘येथे चपला नक्की चोरीस जातात’ अशी आगळीच ग्वाही फक्त पुणेरी देवळातल्या पाटय़ांवरच पाहायला मिळे. ‘फार वरच्या पट्टीत तान घेऊ नकोस, तुला झेपत नाही,’ असा मनमोकळा सल्ला नव्या गायिकेला न विचारता मिळे. मात्र जराशी जरी गुणवत्ता दिसली, मग ते गाणं असो, चित्र-शिल्प वा संशोधन असो, त्या गुणवानासाठी वेळ, पैसा, शब्द खर्चण्याची केव्हाही तयारी असलेले पुणेकरच होते. अख्खं आयुष्य संशोधन करण्यात खर्ची घालणाऱ्या ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, दत्तो वामन यांच्यापासून उलटी पर्वती चढणाऱ्या पेन्शनरांपर्यंत सर्वाच्या ‘जिद्दी’ला सतत सलाम होता.
महानगरपालिकेनं वेळेवर न पाठवलेले हक्काचे ११९ रुपये मिळवण्यासाठी अकरा हजार नऊशे रुपये खर्चण्याची आणि त्यासाठी कोर्टाचे खेटे मारण्याची पुणेकरांची तयारी होती. ‘तत्त्वाचा प्रश्न आहे’ असं म्हणत त्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्यांची संख्या पुढे रोडावली. अश्लीलमरतड मराठे यांच्यापासून कर्तारसिंग थत्त्यांपर्यंत मुलखावेगळय़ा माणसांची फौजच पुण्यात होती. एकच श्रोता समोरच्या सतरंजीवर बसला असतानाही घसा खरवडून राष्ट्रीय प्रश्नावर पोटतिडकीनं बोलणारे (उदा., हिंदू महासभेचे के. कृ. जावडेकर, शांताबाई गोखले) धर्माभिमानी राजकीय नेते या पुण्यात होते. पुलंच्या पहिल्या प्रयोगाची तिकिटं मिळवण्यासाठी पहाटेपासून रांगा लावणारे पुणेकरच आणि उत्तररात्री गजर लावून झोपेतून उठून गणपती मिरवणुकीतल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी धाव घेणारेही पुणेकरच. ‘दक्षिणेचं ताट फिरतंय. कृपया, पावली टाकून रुपया उचलू नका,’ असं मिस्कीलपणे म्हणणारे गोविंदस्वामी आफळय़ांसारखे कीर्तनकार आता पुण्यात कुठे अनुभवायला मिळतात?
त्या काळी पुण्यातील एकूण जीवनशैली वाडासंस्कृतीच सांभाळत होती. पुढे वाडे पडले. जिमखान्यावरच्या बऱ्याच बंगल्यांना फ्लॅट किंवा मॉलसाठी जमीनदोस्त व्हावं लागलं. आय.टी.जग आणि शिक्षणसंस्थांचा वाढलेला पसारा यामुळे कामासाठी किंवा शिक्षणासाठी हिंजवडी ते हडपसर आणि लवळे ते लोणावळा असा रोजचा प्रवास लांबला. मोटारसायकली, स्कूटर्स, सायकली, मोटारी वाढूनही घरी परतण्याच्या वेळा लांबल्या.
घराघरांतला संवाद कमी झाला. एकत्र कुटुंबपद्धत मोडीतच निघाली. नोकऱ्यांना जाणाऱ्या तरुण जोडप्यांच्या सोयीसाठी मुलांना सांभाळणारी ‘पाळणाघरं’ वाढली. सकाळी ऑफिसला जाताना रेडिमेड पोळीभाजी पार्सल्स घेतली जाऊ लागली आणि संध्याकाळी थकून परतण्यामुळे ‘घरा’पेक्षा हमरस्त्यावरचं ‘जेवण’ अपरिहार्य ठरलं. तिन्ही सांजेचा दिवा गेला. ‘शुभं करोति’ची सक्ती संपली. कॉम्प्युटर, करीअर कोर्सेस, झटपट इंग्रजी, व्यक्तिमत्त्व विकासाचे कोर्सेस यामध्ये पर्सनॅलिटीला आकार देण्यात पोरं अडकली आणि त्यांच्या वेळा सांभाळण्यात आई-बाप दमले. रेस्तराँपासून रिक्षावाल्यांपर्यंत कुणाच्याही तोंडी ‘माय मराठी पुणेरी’ऐवजी हिंदी शब्द आले सूर्यनमस्काराचे वर्ग, घुमणाऱ्या तालमी जाऊन अत्याधुनिक यंत्रांसह जिम्स-हेल्थ क्लब्ज, अगदी लेडीज स्पेशल जिम्सपर्यंत पुण्याच्या शरीरस्वास्थ्याची पद्धतच बदलली. कोपऱ्यावरच्या अमृततुल्यांची संख्या कमी होऊन कॅफे, कॉफी डे आणि बरिश्ता फोफावले आणि पूर्वी खानावळीत अख्खी राइस प्लेट ज्या किमतीला मिळायची त्या किमतीत कॉफीचा कप घेण्याची हिंमत पुणेकर करू लागला.
चाळीसच्या बल्बच्या उजेडात तब्येती तपासणाऱ्या ‘फॅमिली डॉक्टर्स’ची कन्सेप्ट जाऊन महागडय़ा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सची संख्या वाढली. सायकली संपत आल्या. मोटारसायकलींना पार्किंग अपुरी पडू लागली आणि चारचाकी गाडय़ांची संख्या वाढल्यानं पुण्याच्या मध्यवस्तीत गाडी घेऊन जाणं मुश्कील झालं. वाहनतळांसाठी ऐतिहासिक थिएटर्स जमीनदोस्त करण्याची पाळी आली. गणपतीतल्या रस्त्यावरच्या मैफली जाऊन सोसायटी गणपतींची वर्गणी अपरिहार्य ठरू लागली. व्याख्यानमाला ओस पडू लागल्यानं विचारवंत वक्त्यांऐवजी स्टार्स, ज्योतिषी, व्यक्तिमत्त्व विकासाच्या इन्स्टंट खुब्या सांगणारे, सेक्सच्या शंका सोडवणारे यांना ‘व्याख्याते’ म्हणून आमंत्रित केलं जाऊ लागलं.
पूर्वी प्रात:काळी लवकर उठून ताजी भाजी खरेदी करण्याचं ‘मंडई’ हे केंद्र होतं. मंडईत रमत-गमत भाजी खरेदी करणं कमी होत जाऊन कॉलन्यांच्या कॉर्नरवर उभे राहय़लेले ‘मॉल्स’ आणि चिरलेली-कापलेली भाजी पॅकबंद देणारी ‘भाजी सेंटर्स’ सोयीची वाटू लागली.
इव्हेन्ट मॅनेजमेंटची दुकानं वाढली. त्यांना मदत करून प्रसिद्धीचा झोत घेणारे प्रायोजक वाढल्यानं गाण्याचे कार्यक्रम रोजचेच झाले आणि त्यातली सुरेलपणाची ‘चव’ कमी झाली. कुणाला हे गळा काढणं वाटेल, पण तसं ते नाही. काळानुसार सर्व स्तरांवर ‘बदल’ अपरिहार्यच असतात. ते स्वीकारावेच लागतात. होणाऱ्या बदलांतून मिळणाऱ्या वाढत्या सोयी लक्षात घेऊन ‘बदलां’ना नाक मुरडून उपयोगाचं नाही. तरीही वाटतं, की शहर कसंही विस्तारो, त्यातलं ‘पुणेरीपण’ पुसलं जाता कामा नये. भाषा, मतं, चळवळी, अभ्यासक, खाद्यसंस्कृती, संगीत यातून ‘पुणेरीपण’ शिल्लक राहायला हवं.
जुने वाडे काळाच्या ओघात पडणं की पाडणं अपरिहार्यच, पण तरीही वाडासंस्कृतीत जोपासलं गेलेलं परस्पर मानवी नातेसंबंधांचं ‘नातं’ फ्लॅट्सच्या कुलपाआड बंदिस्त होता कामा नये. इथलं ज्ञानाचं संकीर्तन थांबता कामा नये. स्थित्यंतराच्या लाटेत अनेक गोष्टी वाहून जातात. पण त्या त्या शहराची ओळख देणारा त्या त्या शहराचा भाषेचा एक लहेजा असतो. ‘पुणेरी बोली’, त्यातली स्पष्टता, त्यातला मिस्कीलपणा हद्दपार होता कामा नये. चर्चा-चिकित्सा-परखड मतप्रदर्शन यात एक पुणेरी मिस्कील छटा आहेच आहे. पुणेरी ‘दाद’ आणि ‘पुणेकरांचं मत’ या गोष्टी जगभरच्या मराठी मंडळींनी मान्य केल्यात. ‘पु. ल.’ म्हणत, की ‘लोकलच्या खडखडाटात, त्या खडखडाटाच्या आवाजाच्या वरच्या पट्टीत जो आपला मुद्दा तावातावानं समजून देत असेल तो माणूस हमखास पुणेरी समजावा!’
यातली गंमत आपण घालवून चालेल का?