कबीर कला मंचच्या माध्यमातून आम्ही विविध शाळा व महाविद्यालयात समतेचा आणि क्रांतीचा संदेश दिला जाणारी गाणी गात असत. एका व्यक्तीच्या माध्यमातून नक्षलवादी अँजेलो सोनटक्के व मिलिंद तेलतुंबडे यांच्याशी कबीर कला मंचच्या सदस्यांचा संपर्क आल्यानंतर हे तरुण नक्षलवादी विचाराकडे झुकत गेले..
कबीर कला मंचचा संस्थापक अमरनाथ चंड्डालिया याला दोन वर्षांपूर्वी अटक झाली होती, तेव्हा त्याने दहशतवाद विरोधी पथकासमोर मंचची कार्यपद्धती उघड केली होती. सन २००२ मध्ये चंड्डालिया याने कबीर कला मंचची स्थापना केली. तो २००८ पर्यंत कबीर कला मंचचा सदस्य होता. २००५ मध्ये शीतल साठे, सचिन माळी, रमेश गायचोर, दीपक ढेगळे, सागर गोरखे यांनी कबीर कला मंचमध्ये प्रवेश केला. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे व ठाणे येथून काही तरुण-तरुणींना अटक केली होती. त्याच वेळी नक्षलवादी अँजेलो हिला अटक केली. तेव्हापासून सचिन, शीतल, रमेश गायचोर आणि सागर गोरखे पसार झाले होते. मंगळवारी सकाळी शीतल आणि सचिन हे मुंबईत विधान भवानसमोर शरण आले आहेत.
चंड्डालिया याने दिलेल्या जबाबानुसार, २००५ साली सचिन, शीतल व इतर हे कबीर कला मंचमध्ये सहभागी झाले. त्याच वेळी माझी एका विद्रोही मासिकाच्या संपादकाच्या ओळखीतून भाकप माओवादी संघटनेच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याच्या माध्यमातून ऑगस्ट २००७ मध्ये अँजेलोशी ओळख झाली. त्यानंतर ती कबीर कला मंचच्या सदस्यांच्या संपर्कात आली. अँजेलो व तिचा पती मिलिंद यांनी पुण्यातील खेड तालुक्यात २०१० मध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यामध्ये कबीर कला मंचचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी तेलतुंबडे याने मार्गदर्शन केले होते. अँजेलो हिने कबीर कला मंचच्या सदस्यांना संघटनेसाठी पूर्ण वेळ देण्याचा आग्रह केला होता. मात्र, तिचे विचार न पटल्याने आपण त्याला नकार दिला होता, असे चंड्डालियाने आपल्या जबाबात म्हटले आहे.
याबाबत शीतलची आई संध्या साठे यांची पुण्यातील कासेवाडी येथे भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांनंतर शीतल व सचिनला टीव्हीवर पाहिले. ते  शरण आल्याचे पाहून खूप आनंद वाटत आहे. त्यांचा नक्षलवाद्यांशी काही संबंध नसून ते निर्दोष आहेत, असे वाटते.