रस्त्यावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांसाठी त्याचे काही अस्तित्वच नाही. दुकानाच्या कट्टय़ावर एक महिन्याहून अधिक बसलेल्या अनेकांसाठी तो केवळ बिचारा, निराधार. एखादं दुसरी व्यक्ती त्याला काहीबाही खायला आणून देत होती, पण तरी त्याच्या डोक्यावरच्या छपराचे काय? हा निरुत्तरितच प्रश्न..
नीलेश (नाव बदलले आहे) अवघ्या आठ वर्षांचा. त्याच्या वडिलांचे एचआयव्हीमुळे निधन झाले. नीलेशच्या जन्मानंतर त्याची आई त्याला सोडून गेली. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर तो पोरका झाला. त्याच्या चुलत्यांनीदेखील त्याच्याकडे पाठ फिरवली. मग घरकाम करणाऱ्या त्याच्या आत्याने घरची गरिबी असूनदेखील त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. नीलेश शाळेतही जात होता. त्याची आत्या ज्यांच्याकडे काम करते, त्या गीता जाधव त्याचा अभ्यासही घेत होत्या. त्यातच नीलेशला वयाच्या पाचव्या वर्षी एचआयव्हीबरोबरच क्षयाच्या आजारानेदेखील ग्रासले. त्याच्यावर आत्याने उपचार सुरु केले, पण बाधेच्या भीतीपोटी आत्याच्या घरातील मंडळींनी त्याची ट्रंक भरुन देत त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला. नीलेशला त्याच्या ऐंशी वर्षांच्या आजोबांनी घरात ठेवून घेतले नाही. ते एरंडवणा परिसरात रखवालदार म्हणून नोकरी करतात. त्या ठिकाणी मात्र नीलेशची रात्रीची झोपण्याची सोय झाली. तेथेच आडोशाला तो झोपू लागला. दिवसभर एका दुकानाच्या कट्टय़ावर बसून राहू लागला. नीलेशच्या काकांपैकी दोन काका रस्ता झाडण्याचे काम करतात. नीलेश ज्या परिसरात बसला होता, तो रस्ता त्यांच्याकडे झाडण्यासाठी होता. तो रस्तादेखील त्यांनी बदलून घेतला.
नीलेशचे खाण्यापिण्याचेदेखील हाल झाले. एक महिन्याहून अधिक काळ असाच गेला. त्याला गेल्या सोमवारी मयूर दधिच या तरुणाने बघितले आणि नीलेशसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यासाठी गीता जाधव,दीप्ती कुलकर्णी, तेजस भुजबळ, तनुजा शिंपी आदी मंडळींशी चर्चा केली. या मुलाला निवारा मिळायला हवा, त्याची राहण्याची तसेच त्याची उपचाराची योग्य सोय व्हायला हवी, या विचारांनी ही सगळीच मंडळी झपाटली होती. त्यांना पुण्यातीलच ‘वंचित विकास’ या सामाजिक संस्थेचा मार्ग दिसला. त्यांनी संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला. संस्थेतील कार्यकर्ती जमिला इनामदार हिच्याकडे नीलेशला मदत मिळवून देण्यासाठीची जबाबदारी सोपवली. आता या तरुणाईबरोबर विश्वासाचा आणि मदतीचा आणखी एक हात जोडला गेला होता. या सगळ्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली आणि त्याची कात्रजजवळील गुजरवाडी येथील एचआयव्हीबाधित मुलांना सांभाळणाऱ्या ‘ममता फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेमध्ये निवाऱ्याची सोय केली. तिथला परिसर, तेथील शिस्तप्रिय पण नवी ऊर्जा देणारं वातावरण, आपल्यासारखीच काही मुलं यामध्ये तो सामावून गेला.