स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमानमध्ये होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. पाच आणि सहा सप्टेंबरला हे संमेलन होणार असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी सांगितले.
साहित्य महामंडळाच्या गेल्या बैठकीत अंदमानमध्ये संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठान आणि ‘ऑफबीट’ ही प्रवासी संस्था अशी दोन निमंत्रणे आली आहेत. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळाले नाही तरी संमेलन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास या दोन्ही संयोजकांनी व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंदमानमध्ये संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
केवळ मराठी प्रांतापुरता विचार न करता जगभरातील मराठी माणसांचा स्नेहमेळावा, या उद्देशातून विश्व साहित्य संमेलन ही संकल्पना आकाराला आली. अमेरिकेतील सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूर अशी तीन संमेलने झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलन घेण्यामध्ये अपयश आले होते. त्यानंतर आता अंदमानमध्ये हे संमेलन घेण्यात येणार आहे.