शिक्षणातील वेगवेगळे प्रयोग, नव्या पद्धती असे अनेक प्रवाह शाळा पडताळून पाहात असतात. शिक्षणातील या वेगवेगळ्या प्रयोगांची ‘शिक्षण वारी’ पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून (२७ जानेवारी) तीन दिवस ही वारी बालेवाडी येथे होणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रयोगांचे एकत्रित प्रदर्शन शिक्षण वारीच्या माध्यमातून पाहता येणार आहे. राज्यभरातून निवडलेले ५० शिक्षण विषयक प्रकल्प, व्याख्याने, प्रात्यक्षिके याचा या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे. ज्ञानरचनावादी शाळा, आयएसओ प्रमाणित शाळा, डिजिटल शाळा, लोकसहभागातून शाळा सुधारणा अशा अनेक मुद्दय़ांवरील मांडणी केली जाणार आहे. या शिवाय शिक्षकांसाठी भूगोल, विज्ञान, गणित, इंग्रजी यांबरोबरच मूल्यशिक्षण, समानता, व्यवसाय शिक्षण यांचेही विषयानुरूप स्टॉल्स असणार आहेत.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात हे प्रदर्शन भरणार आहे. २७ ते ३१ जानेवारी असे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातील ८ हजाराहून अधिक शिक्षक भेट देतील असा अंदाज शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दर दिवशी सर्व जिल्ह्य़ातील साधारण अठराशे शिक्षक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. ३१ जानेवारीला सर्व जनतेसाठी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार आहे.

शैक्षणिक प्रयोगांची कोटी उड्डाणे?
सर्व शिक्षा अभियानांत ‘लोकजागृती’साठी तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या तरतुदीचा वापर ‘शिक्षण वारी’ साठी करण्यात येणार आहे. मात्र शैक्षणिक प्रयोगांची ही कोटीची उड्डाणे शिक्षणाचा प्रसार आणि लोकजागृतीसाठी कितपत उपयोगी ठरणार असा प्रश्न शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.