डेक्कन परिसरामध्ये शिरोळे रस्त्यावरील इमारतीतील बंद सदनिका फोडून चोरटय़ांनी साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी दुसऱ्या एका इमारतीतील सदनिकाही फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शंतनू रमेश कोल्हापुरे (वय ३९, रा. कांचनश्री अपार्टमेंट, शिरोळे रस्ता, डेक्कन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरे यांची शिरोळे रस्त्यावरील कांचनश्री अपार्टमेंटमध्ये सदनिका आहे. कोल्हापुरे व त्यांच्या भावाचा रसायनांच्या पुरवठय़ाचा व्यवसाय आहे. कांचनश्री अपार्टमेंटच्या शेजारील इमारतीमध्येही त्यांची एक सदनिका आहे. त्यांचे वडील आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरी कोणी नसल्याने मंगळवारी रात्री त्यांनी कांचनश्री अपार्टमेंटमधील सदनिकेला कुलूप लावले व शेजारील इमारतीमधील सदनिकेत ते झोपण्यासाठी गेले. याच दरम्यान रात्री अज्ञात    चोरटय़ांनी त्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडले.
चोरटय़ांनी घरात प्रवेश करून दोन लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या रजनीगंधा अपार्टमेंट व कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणीही चोरटय़ांनी दोन सदनिका फोडल्या. मात्र, या सदनिका रिकाम्या असल्याने त्यांच्या हाती काही लागले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापुरे यांच्या घरी वर्तमानपत्र देण्यासाठी आलेल्या विक्रेत्याला सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. या विक्रेत्याने कोल्हापुरे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार ते घरी गेले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
सीसीटीव्ही कॅमेरे कुठेच नाहीत
सदनिका फोडलेल्या कांचनश्री अपार्टमेंटबरोबरच चोरटय़ांनी आणखी दोन सदनिका फोडलेल्या सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर शिरोळे रस्त्यावर कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरटय़ांबाबत अधिक माहिती पोलिसांना मिळालेली नाही. मात्र, इतर मार्गाने चोरटय़ांचा शोध घेतला जात असल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी सांगितले.