बनारस या शहराचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक राजधानी, हिंदूू आणि जैन धर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या बनारसचे बौद्ध धर्माच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. बनारस पान आणि बनारसी शालू ही वैशिष्टय़े चित्रपटगीतांतूनही झळकली आहेत. अशा बनारसची नावीन्यपूर्ण वैशिष्टय़े त्याच्या सौंदर्यासह चित्रांतून उलगडणार आहेत.
प्रसिद्ध चित्रकार यशवंत शिरवाडकर यांचे ‘बनारस’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन गुरुवारपासून (१७ मार्च) भोसलेनगर येथील इंडिया आर्ट गॅलरी (लावण्य, प्लॉट नंबर ३०) येथे भरविण्यात येत आहे. ३० मार्चपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती मििलद साठे यांनी दिली.
गेल्या तीन दशकांहून अधिककाळ शिरवाडकर यांचे नाव बनारसशी जोडले गेले आहे. त्यांनी साकारलेली बनारसच्या घाटांची चित्रे कलाप्रेमींसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहेत. गंगेच्या काठावर उभ्या असलेल्या इमारतींचे सौंदर्य शिरवाडकर यांच्या चित्रांतून न्याहाळता येते. वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या या इमारतींची भव्यता आणि नवचैतन्य निर्माण करणाऱ्या पावित्र्याचा अनुभव रसिकांना या चित्रांतून घेता येईल. शिरवाडकर यांनी स्वत:ची अशी खास शैली विकसित केली आहे. कॅनव्हासवर तैलरंगाच्या माध्यमातून चाकुच्या (क्निफ) फटकाऱ्यांचा प्रभावी वापर हे त्यांच्या चित्रकलेचे खास वैशिष्टय़ आहे.