तयार कपडय़ांच्या दुकानांमध्ये स्त्रियांच्या पुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या विरोधात मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरीतही आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिला. दोन्ही शहरांमधील व्यावसायिकांना आम्ही ७ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलन सुरू होईल, असे गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तयार कपडय़ांच्या बहुतांशी दुकानांमध्ये मांडण्यात येणाऱ्या स्त्रियांच्या पुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून हे पुतळे दर्शनी भागात ठेवले जातात. त्यातून स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असा संदेश जातो. मुंबई महापालिकेने अशा प्रकारांना बंदी घालणारा ठराव केला असून पुण्यातही व्यावसायिकांनी असे पुतळे ७ जूनपर्यंत काढून टाकावेत, अन्यथा, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी आंदोलन करेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, तसेच पक्षाच्या नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या.
शहरात जाहिरात फलकांच्या माध्यमातून ज्या जाहिराती केल्या जातात त्यातही स्त्रियांच्या अंगप्रदर्शनावरच भर दिलेला असतो. अशा प्रकारांच्या विरोधात आकाशचिन्ह विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या पुणे व पिंपरीतील नगरसेविका आणि महिला पदाधिकाऱ्यांसाठी दर महिन्यात एक दिवस प्रशिक्षणाचाही कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘पुण्याची जागा मित्रपक्ष भाजपकडेच’
भाजप-शिवसेना युतीत सहभागी झालेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पुणे लोकसभेची जागा मागितली आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, युतीच्या जागावाटपात पुण्याची जागा आमचा मित्रपक्ष भाजपकडे आहे आणि युतीमध्ये मित्रपक्षाची जागा तिसऱ्याला दिली जात नाही. मात्र, जागावाटपात आम्ही आरपीआयचा योग्य तो सन्मान ठेवू.