निवडणुकांतील आकडेवारी पाहता शिवसेनेसाठी निर्णय अडचणीचा

आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असला तरी पुण्यात मात्र सेनेसाठी ‘स्वबळा’ची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतील विजयामुळे भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, हडपसर आणि कोथरूड हे हक्काचे बालेकिल्ले राखण्यात शिवसेनेला आलेले अपयश, तसेच स्वबळावर लढलेल्या विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता स्वबळाचा नारा पुण्यात तरी शिवसेनेसाठी काहीसा अडचणीचा ठरणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. शिवसेनेच्या या निर्णयावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. स्वबळावर लढल्यास मुंबईत फायदा होईल की अन्य कोणत्या शहरात याबाबतही तर्क-विर्तक लढविण्यास सुरुवात झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेपुढील आव्हाने, स्वबळावर लढलेली विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील आकडेवारी पाहता ही वाट अवघड ठरणार असल्याचे दिसून येते.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी युती होती. त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत अचानक युती तोडण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपचे आठही उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. विशेष म्हणजे कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदार संघ हे सेनेचे बालेकिल्लेही भाजपच्या ताब्यात गेले. पक्षातील अंतर्गत वाद, मतभेदाचा फटका शिवसेनेला बसला. भाजपची शहरातील ताकद वाढली. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानंतर पक्षाला मिळालेल्या टक्केवारीचे प्रमाणही पंचवीस टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिले. कोथरूड विधानसभा मतदार संघात १८ टक्के, तर हडपसर विधानसभा मतदार संघात २४ टक्के मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली. काही विधानसभा मतदार संघात सेनेचे उमेदवार तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर गेले.

महापालिका निवडणुकी दरम्यान स्वबळावर लढण्याची मागणी सातत्याने कार्यकर्त्यांकडून सुरू झाली. ही निवडणूकही शिवसेनेने स्वबळावर लढवली. पण शिवसेनेचे अवघे आठ उमेदवार विजयी झाले. त्यापूर्वी म्हणजे सन २०१२ रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या सन २०१२च्या निवडणुकीत असलेल्या २६ जागांवरून २०१७ मध्ये तब्बल ९८ जागा भाजपला मिळाल्या. त्यामुळे भाजपची शहरात ताकद वाढल्याचे चित्र सध्या तरी आहे. महापालिका निवडणुकीत युती न झाल्याचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चाही त्यामुळे पक्षातूनच सुरू झाली होती.

विधानसभा निवडणुकीनंतर शहर शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. मात्र अंतर्गत वाद आणि धुसफुशी बरोबरच संघटनात्मक बांधणी करण्यातही शिवसेनेला काही प्रमाणात अपयश आल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यामुळे आता पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे आव्हान शहर शिवसेनेपुढे आहे.

पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. सेनेला मोठा जनाधार असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. स्वबळाच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असून नागरी हिताचे प्रश्न हाती घेण्यात आले आहेत. पक्षाला शहरात मोठे यश मिळेल.

– चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख, शिवसेना</strong>