शिवसेनेच्या बारामती शहरप्रमुखाच्या भरधाव जाणाऱ्या गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी घडली. यात दोन्ही विद्यार्थिनींचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामती-मोरगाव रस्त्यावरील कऱ्हा वागजजवळ हा अपघात घडला. या अपघातानंतर संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली.

समीक्षा मनोज विटकर (वय १२) आणि विद्या ज्ञानेश्वर पवार (वय १३) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघींसह अपघातामध्ये जखमी झालेली पायल संजय लष्कर या तिघी (कऱ्हा वागज, लष्कर वस्ती ता. बारामती) येथील रहिवासी होत्या. तिघी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात शिकत होत्या. सकाळी शाळेला जात असताना भरधाव वेगाने असणाऱ्या पजेरोने त्यांना समोरुन धडक दिली. यात समीक्षा आणि विद्याचा जागीच मृत्यू झाला. तर पायल ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बारामती शहरप्रमुख पप्पू माने यांच्या मोटारीमधून ऋषिकेश चौधर, आकाश माने व इतर दोघे जण भरधाव वेगाने मोरगावच्या दिशेने जात होते. अपघातानंतर ते फरार झाले. याप्रकरणी संतोष धोत्रे यांनी फिर्याद दिली असून, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड हे करत आहेत.