पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. स्थायी समिती सदस्य पदावरील नियुक्तीच्या कारणाने झालेल्या उद्रेकातून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी मंगळवारी गटनेतेपदाचा राजीनामा दिला. महापालिका निवडणूक एक वर्षावर आली असून शिवसेनेत गटबाजी सुरू झाल्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदावर १८ फेब्रुवारी रोजी नवीन आठ सदस्यांची निवड झाली. शिवसेनेच्या कोट्यातून नगरसेविका अश्विार्नी चिंचवडे यांचे नाव एका गटाने दिले होते. चिंचवडे या खासदार श्रीरंग बारणे यांच्या गटाच्या आहेत. त्यामुळे कलाटे यांनी त्यांच्या नावाला विरोध करून त्याऐवजी नगरसेविका मीनल यादव यांचे नाव स्थायी समिती सदस्य पदासाठी दिल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला. आक्रमक झालेल्या विरोधी गटाने कलाटे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. त्यावर पक्षाच्या नेत्यांनी कलाटे यांना नोटीस देऊन खुलासा मागितला. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार कलाटे यांनी पक्षाकडे रितसर खुलासा सादर केला होता. त्यानंतर नाराज झालेल्या कलाटे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा दिला. कलाटे हे प्रभाग क्रमांक २५ वाकड येथून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी चिंचवड मतदार संघातून विधानसभेची निवडणूकही लढविली होती.

मीनल यादव या पक्षाच्या जुन्या कार्यकत्र्या आहेत. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकत्र्या असताना अनेक वर्ष महापालिकेतील महत्त्वाची पदे त्यांना मिळाली नव्हती. पक्षाच्या कार्यालयात आलेल्या अर्जामध्ये अश्विानी चिंचवडे यांचा अर्ज आला नव्हता, ऐनवेळी त्यांचा अर्ज आला. त्यामुळे गटनेता म्हणून मी यादव यांचे नाव स्थायी समिती सदस्यपदासाठी सुचविले. पक्षाने त्याबाबत खुलास मागितला. रितसर खुलास दिला, त्यानंतर गटनेतेपदाचा राजीनामा देण्यास सांगितले गेले. पक्षाच्या आदेशानुसार मी राजीनामा दिला. कोणतीही गटबाजी किंवा नाराजी नाही. – राहुल कलाटे, माजी गटनेते शिवसेना  पिंपरी चिंचवड महापालिका