एमपीएससी ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील दोन वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने ३० जून रोजी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यालाच एकप्रकारे धक्का बसला. या घटनेनंतर राज्य सरकारविरोधात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह जनसामान्यांमध्ये संतापाची भावना दिसून आली. तर, विरोधकांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला या मुद्य्यावरून धारेवर धरल्याचे दिसून आले. अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. तर, दुसरीकडे स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांच्या सांत्वानासाठी नेते मंडळींची रीघ लागल्याचेही दिसून आले. मात्र, लोणकर कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज (गुरूवार) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.

या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली असून, सोबत लोणकर कुटुंबीयांची भेट घेतानाचे व त्यांना मदत देतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. ”एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.” असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. ३१ जुलै अखेरपर्यंत १५,५०० हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई आणि आमदार तानाजी सावंत, स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

“अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय”, असा जळजळीत सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी सरकारला केला होता.  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लोणकर कुटुंबीयांची काल भेट घेतली तेव्हा, स्वप्निलच्या आईने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

“…तर आम्हा तिघांची आत्महत्या सरकारला पाहावी लागेल”, स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश!

“१५ दिवस झाले. फक्त येऊन भेटून जातात. प्रत्येक जण आश्वासन देऊन जातात. सरकारनं ठाम सांगावं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. दोन महिन्यांनी सरकार कुणाचं का असेना, सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील. आमच्या पोटचा गोळा गेला. आम्ही त्याला कसं शिकवलं आमचं आम्हाला माहिती. यांनी थोडे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. दोन दोन वर्ष निर्णय लांबवले. करोना काळात दोन दोन महिने फक्त लॉकडाउन केलं होतं. बाकीचं सगळं चालूच होतं”, असं छाया लोणकर म्हणाल्या होत्या.