पिंपरी महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होण्याचा मार्ग बिकट असताना आणि भाजपने ‘एकला चलो रे’ चे संकेत दिले असताना शिवसेनेनेही त्याचीच ‘री’ ओढली आहे. सोमवारी झालेल्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत स्वबळावर निवडणुका लढवण्याचे सूतोवाच खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे.
खासदार म्हणून दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने बारणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दोन वर्षांतील कामांचा आढावा घेतला. यावेळी युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सद्यस्थिती पाहता शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल असे वाटते, असे विधान केले. तथापि, युतीसंदर्भातील अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरप्रमुख राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, सल्लागार भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते. महापालिका स्तरावर भाजप व शिवसेनेत तीव्र कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. खासदार बारणे व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातून विस्तव जात नसल्याने युतीची शक्यता धूसर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यापूर्वीच स्वतंत्र वाटचालीचे सूतोवाच केले आहे. जगताप हे देखील त्याच मताचे आहेत. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी बारणे यांनीही स्वतंत्र लढण्याचे सूतोवाच केले आहे.
खासदार म्हणून दोन वर्षांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे सांगून बारणे म्हणाले की, महापालिकेचा अनुभव संसदेत उपयोगी पडला. अनेक प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावले. लोकसभेत ५४३ प्रश्न उपस्थित केले, १४१ वेळा चर्चेत सहभागी झालो. सात खासगी विधेयके सादर केली आणि उपस्थिती ९१ टक्के राहिली. एच. ए. प्रकरणी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली असल्याचे बारणे यांनी सांगितले.