महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष या त्रिकुटाने पुणेकरांच्या विकासात अडथळा आणला आहे, असा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी महापालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात आला.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील या मोर्चाला मंडई येथून प्रारंभ झाला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता असतानाही त्यांना नागरी हिताच्या योजना राबविता आल्या नाहीत. पुणेकरांना आश्वासन दाखविण्याचे काम त्यांनी केले आहे, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही त्यांनी पुण्याच्या विकासात अडथळा आणला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कारभारावर जनता नाराज असून त्यांना शिवसेनेचा सक्षम पर्याय असल्याचे यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगतिले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर झेंडा फडकवेल असा विश्वास शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी व्यक्त केला.