दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी धक्कादायक विधान केले होते. याचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड शहरात उमटले असून भोसरी येथे शिवसेनेच्यावतीने दानवे यांच्या प्रतीमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर हरियाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसून त्यांच्या आंदोलनाला अनेकांची साथही मिळत आहे. या आंदोलनाबद्दल काही नेत्यांकडून आरोप आणि धक्कादायक विधानं करण्यात आली होती, तसंच आंदोलनावर प्रश्नही उपस्थित केले होते.

भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान चा हात असल्याचा दावा केला आहे. या विधानामुळे महाराष्ट्रात चांगलच राजकारण तापलं असून विविध पक्ष, संघटना तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीतदेखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत फलकवरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.

काय म्हणाले होते दानवे?

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले होते. “हे आंदोलन चालू आहे मात्र हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. एकाला तरी बाहेर जावं लागलं का?,” असाही प्रश्न त्यांनी विचारला.