काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका एकत्र लढत असताना भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने वेगवेगळे लढणे हे धाडसाचे ठरेल. राज्यात सरकार आणायचे असेल तर धोका पत्करून चालणार नाही, याची जाणीव शिवसेनेनेही ठेवावी, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.

मुख्यमंत्रिपदासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांवर भाष्य करताना राजकारणात स्वप्ने पाहण्यात आणि ती वारंवार व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही. वास्तवात काय होईल ते ठरलेले आहे, असेही पाटील म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील विधानसभेच्या आठही जागांवर दावा सांगतानाच त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. मी पाच जिल्ह्य़ाच्या पदवीधर मतदारसंघामध्ये लढतो. शरद पवारांनी कधी पाच जिल्ह्य़ातून निवडणूक लढविली आहे का, असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले की, भाजपमध्ये येण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे विरोधक धास्तावले आहेत. मात्र जे घेतो ते तावून सुलाखूनच घेतो. राज्याच्या मंत्रिमंडळात पाच वर्षांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना घेण्यात आले. विखे यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. भुजबळांना पक्षात घेण्यात आले नाही. भाजपच्या संस्कृतीशी जुळतील, अशाच नेत्यांना पक्षप्रवेश दिला जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.