मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने सलग दोन वेळा भगवा फडकावला. युती म्हणून दोनदा विजयश्री मिळवल्यानंतर यापुढे मात्र स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्यामुळे बलाढय़ भाजपसह स्वत:ची ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करत मावळची जागा राखताना शिवसेनेला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात येऊ लागले आहेत. काही दिवसापूर्वी मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी चिंचवडला आलेले केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी, बारणे यांना मावळसाठी ‘हिरवा कंदील’ असल्याचे सूतोवाच केले होते. वास्तविक, बारणे यांनी त्याही आधीपासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. १६ फेब्रुवारीला झालेल्या वाढदिवशी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करत प्रचाराची फेरीच पूर्ण केली आहे.

श्रीरंग बारणे मूळचे काँग्रेसचे. काही काळ ते राष्ट्रवादीतही होते. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस नगरसेवकपदाचा राजीनामा दिला व पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले बारणे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पराभूत झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बारणे-जगताप पुन्हा ‘आमने-सामने’ आले, तेव्हा बारणे यांनी पराभवाचे उट्टे काढले. लोकसभा निवडणुकीत बारणे यांना पाच लाख १९ हजार २२६, जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते आणि राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना एक लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. त्याआधी, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार आणि राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांना दोन लाख ८४ हजार मते मिळाली होती. बाबर ८० हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. सलग तिसऱ्यांदा मावळ आपल्याकडे राखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र आता भाजपचे कडवे आव्हान आहे. राष्ट्रवादीही लढतीत राहणार असल्याने लढतीचे स्वरूप तिरंगी राहणार आहे.

गेल्या वेळी बाबर व बारणे यांच्या उमेदवारीवरून बरीच स्पर्धा झाली होती, त्यातून पुढे बरेच नाटय़ रंगले होते. त्या तुलनेत यंदा बारणे यांना उमेदवारीसाठी स्पर्धा नाही. त्यांची उमेदवारी तूर्त निश्चित मानली जाते. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, ऐन वेळी वरिष्ठ नेत्यांच्या धोरणानुसार कोणताही बदल होऊ शकतो. खालच्या टापूत शेकापची मते निर्णायक ठरू शकतात. शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद आहेच. ठाकूर परिवार पक्षात आल्याने भाजपची ताकदही बऱ्यापैकी वाढली आहे. तूर्त राजकीय पातळीवर चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. मावळमधील पिंपरी-चिंचवडच्या पट्टय़ात अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, मावळ पाणी योजना, संरक्षण खात्याचे प्रश्न, पिंपरी पालिकेचा कारभार, वाढती गुन्हेगारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आदी विषय कळीचे मुद्दे ठरणारे आहेत.

मावळ लोकसभेतील आमदार

  • गौतम चाबुकस्वार, पिंपरी (शिवसेना)
  • लक्ष्मण जगताप, चिंचवड (भाजप)
  • बाळा भेगडे, मावळ (भाजप)
  • मनोहर भोईर, उरण (शिवसेना)
  • प्रशांत ठाकूर, पनवेल (भाजप)
  • सुरेश लाड, कर्जत खालापूर (राष्ट्रवादी)