केंद्रात व राज्यात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची कसल्याही प्रकारची घुसमट होत नाही, असे एकीकडे सांगतानाच सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी, आम्ही आतापर्यंत मनगटाच्या जोरावर कामे करवून घेतली, यापुढेही तेच करावे लागणार असल्याचे सूचक विधान पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केले.
‘खासदार आपल्या दारी’ या उपक्रमात भोसरी मतदारसंघातील नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी आढळरावांनी आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते.
आढळराव म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा आम्ही विकासकामांसाठी दहा रुपये मागितले की, एक रुपया मिळत होता. आता अवघे ८० पैसे मिळत आहेत. सत्तेत नव्हतो तेव्हा संघर्ष करावा लागला, आजही संघर्ष करावा लागतो आहे. आधीही मनगटाच्या जोरावर कामे करवून घेत होतो. आताही तेच करावे लागते आहे. संघर्षांपासून आमची सुटका नाही, असे ते म्हणाले. सरकारकडे पश्चिम महाराष्ट्रासाठी वेळ नाही. िपपरीचा स्मार्ट सिटीत समावेश न होण्यास सरकारच जबाबदार आहे. मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प रद्द झालेला नाही. संरक्षणमंत्री सकारात्मक असल्याने रेडझोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पीमपीचा कारभार विस्कळीत असून तो सुधारला पाहिजे. घरकुल म्हणजे समस्यांचे माहेरघर बनले आहे, असे त्यांनी नमूद केले.