शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख म्हणून गेल्या सात वर्षांपासून ‘कागदोपत्री’ जबाबदारी सांभाळणारे भगवान वाल्हेकर यांना नव्या रचनेत उपजिल्हाप्रमुख पदावर ‘बढती’ देण्यात आली असून शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांनुसार तीन शहरप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. शिवसेनेत नव्याने दाखल झालेले राहुल कलाटे यांच्याकडे चिंचवड, खासदार गजानन बाबर यांचे पुतणे योगेश बाबर यांच्याकडे िपपरी तर, खासदार शिवाजीराव आढळराव यांचे कट्टर समर्थक विजय फुगे यांच्याकडे भोसरी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची नव्याने रचना करण्यात आली असून त्यात गटातटात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खासदार बाबरांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्हेकरांची उचलबांगडी न करता त्यांना आडमार्गाने बाजूला करत उपजिल्हाप्रमुखपद करण्यात आले व त्यांच्या कार्यक्षेत्रातून भोसरी वगळण्यात आले आहे. नाशिक, औरंगाबाद, पुण्यापाठोपाठ पिंपरीतही एकच शहरप्रमुख न ठेवता विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांचे समर्थक कलाटे यांच्याकडे चिंचवडची जबाबदारी देण्यात आली आहे. कलाटे यांच्याकडे चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. पिंपरी मतदारसंघात योगेश बाबर तर भोसरीत विजय फुगे यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेतील गटबाजी तीव्र होऊ लागली असून प्रत्येकाची वेगळी ‘सुभेदारी’ निर्माण झाली आहे. गटातटाच्या राजकारणात पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. वाल्हेकर यांच्याकडे शहरप्रमुखपद असले तरी ते फारसे कार्यरत नव्हते. तथापि, ते सर्वाशी मिळून-मिसळून वागत असल्याने त्यांच्याविषयी तक्रारीचा सूरही कोणी काढत नव्हते. फेरबदल करतानाही जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या खालोखाल उपजिल्हाप्रमुखपद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, विधानसभा प्रमुख नियुक्त करताना स्थानिक नेत्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.