हिंदूू समाजाची शक्ती ही कधीच विध्वसंक नाही, तर ती सज्जनांना आश्वस्त करणारी आणि दुर्जनांनी सज्जन व्हावे यासाठी प्रेरणा देणारी आहे. अशा सज्जनशक्तीचे दर्शन म्हणजे शिव-शक्तीचा संगम असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी रविवारी व्यक्त केली.
संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे आयोजित आगामी ‘शिव-शक्ती संगम’ कार्यक्रमाच्या भूमिपूजनप्रसंगी जोशी बोलत होते. फुलगाव येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते हिंजवडीजवळील मारुंजी गाव येथे हे भूमिपूजन झाले. संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक बापू घाटपांडे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, महापालिका आयुक्त राजीव जाधव, सरपंच रोहिणी साखरे, प्राची बुचडे, कलादिग्दर्शक नितीन देसाई, इस्कॉनचे गोपती दास, देहू संस्थानचे शिवाजीराव मोरे, शिवाजीमहाराज नवले, नवनाथमहाराज शिंदे या वेळी उपस्थित होते. पौरोहित्याचे शिक्षण घेतलेल्या समाजातील वंचित घटकांच्या युवकांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.
जोशी म्हणाले, दुर्जनता संपते तेव्हा सज्जनशक्ती उभी राहते. समाजामध्ये सज्जनशक्ती उभी करण्याचे काम संघ गेल्या ९० वर्षांपासून करीत आहे. संघाची ही संघटित शक्ती देशापुढील सर्व समस्यांना उत्तर देणार आहे.
जातीपातीमध्ये विस्कळीत झालेल्या हिंदूू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रचे उत्थान घडवून आणण्यासाठी संघटनेची गरज आहे. त्यामुळेच शिव-शक्ती संगमसारखा कार्यक्रम ही काळाची आवश्यकता असल्याचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. संघाचे प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, या कार्यक्रमाचे महाव्यवस्थापक कैलास सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.