18 September 2020

News Flash

पारंपरिक उत्साहात शहरामध्ये शिवजंयती साजरी

पारंपरिक उत्साहात शहरामध्ये शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.

| March 31, 2013 02:35 am

‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात छत्रपतींच्या गडकोटांवरून पहाटेपासून शहरामध्ये मावळ्यांनी आणलेल्या शिवज्योती.. चौकाचौकात घालण्यात आलेल्या भगव्या मंडपामध्ये विराजमान झालेले सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज.. जागोजागी डौलाने फडकणारे भगवे ध्वज.. वीरश्रीने भारलेल्या शिवचरित्रातील विविध प्रसंगांचे रोमांचकारी वर्णन करणाऱ्या शाहिरी पोवाडय़ांच्या ध्वनिफिती.. अशा पारंपरिक उत्साहात शहरामध्ये शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती आणि संकष्टी चतुर्थी असा दुहेरी योग यंदा जुळून आल्यामुळे गणरायाबरोबरच भाविकांनी छत्रपती शिवरायांना वंदन केले.
महाराष्ट्र शाहीर परिषदतर्फे भवानी पेठेतील भवानी माता मंदिरापासून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते सायंकाळी भवानी मातेची आरती झाली आणि या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पोळ यांनी पूजन केले. ‘छत्रपतींची कोकण स्वारी’ हा शंभर कलाकारांचा समावेश असलेला अभिनव चित्ररथ आणि युवा कार्यकर्त्यांची लाठी-काठी ही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे दादा पासलकर, हेमंत मावळे, विघ्नहर्ता न्यासचे डॉ. मिलिंद भोई, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक मििलद काची आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर याप्रसंगी उपस्थित होते. अखिल भवानी पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नाना पेठ, लक्ष्मी रस्ता, फडके हौद, लाल महाल या मार्गाने शनिवारवाडा येथे मिरवणुकीची सांगता झाली.
लहान मुलांना खाऊवाटप, महिलांसाठी हळदी-कुंकू अशा उपक्रमांच्या आयोजनाने जनता वसाहत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. युवकांनी सिंहगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. रांगोळी आणि फुलांची आकर्षक सजावट करून शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवसेनेतर्फे गणेशखिंड रस्ता येथील सेंट्रल मॉल चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली.
 
शिवजयंती उत्सवाला लाभले
सामाजिक उपक्रमांचे कोंदण
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचे भान राखून विविध मंडळांनी शिवजयंती मिरवणूक रद्द करून या उत्सवाला सामाजिक उपक्रमांचे कोंदण दिले. सुवर्णयुग तरुण मंडळाने मिरणुकीवरील खर्च कमी करून ५१ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे ठरविले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांनी सांगितले. मंडळाने रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करून पुणेकरांना रांगोळीच्या माध्यमातून पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला. सेवा मित्र मंडळातर्फे तळजाई टेकडी येथील मोरांसाठी धान्य देण्यात आले आणि मोरांचे संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे परिसरातील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पक्ष्यांना धान्य आणि पाणी देण्यासाठी भांडय़ांचे वाटप करण्यात आले. प्रभात मित्र मंडळातर्फे दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्याच्या भावनेतून आवकळवाडी (ता. जत, जि. सांगली) येथील चारा डेपोला कडबा आणि पशुधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे दृष्टिहीन, अपंग बांधवांना सक्षम करण्यात योगदान देणाऱ्या राहुल देशमुख यांना प्रभात पुरस्कार प्रदान करण्यात आला, असे किशोर चव्हाण यांनी कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:35 am

Web Title: shiva jayanti celebrated in huge jubiliation
Next Stories
1 परिसरात शाळाबाह्य़ मुले दिसल्यास आता शाळेवरच कारवाई करणार
2 एलबीटीच्या विरोधात उद्यापासून व्यापाऱ्यांचा बेमुदत बाजार बंद
3 पुणे, पिंपरीतील जकात उद्यापासून ‘आठवणी’त
Just Now!
X