शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘युगप्रवर्तक’ हे महानाटय़ पुण्यात १९ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महानाटय़ाचे निर्माते हिम्मत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आणखी एक महानाटय़ पाहायला मिळणार आहे.
या महासिनेनाटय़ामध्ये इतिहास व आधुनिक तंत्रज्ज्ञानाचा सुयोग्य संगम आणि ५०० हून अधिक कलाकार सहभाग राहाणार आहे. तसेच हत्ती, घोडे, उंड, बैलगाडय़ा, ऐतिहासिक वैशिष्टय़ांनी नटलेल्या सरकत्या रंगमंचावर सादरीकरण करताना प्रथमच एल.ई.डी.वर हे महानाटय़ दाखवण्यात येणार आहे. महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर पुरुषोत्तम (ऊर्फ राजू) राऊत यांनी केले आहे. रणशूरत्वाचे निव्वळ दाखले न देता शिवरायांचे सर्वसाक्षी, सर्वगामी, सर्वस्पर्शी, लोकहितैष्यू असलेले व्यक्तिमत्त्व महानाटय़ाच्या माध्यमातून दाखवणार असल्याचे लेखक राऊत यांनी या वेळी सांगितले. या महानाटय़ात शिवजन्म, स्वराज्याची संकल्पना, जिजाऊंचे ज्वलंत स्वप्न, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळा वेढा, शिवा काशिदचे बलिदान, पावनखिंड युद्ध, शाहिस्तेखानावर छापा, सुरतेची मोहीम, सतिप्रथेला आळा, सागरी आरमाराचे प्रवर्तक, मिर्झा राजांशी तह, आग्य्राहून सुटका, तानाजी मालुसरे बलिदान, शिवरायांचे शेती, व्यापारी, आर्थिक व मराठी भाषेसंबंधी धोरण तसेच, भव्य राज्याभिषेक या प्रसंगांचा समावेश असेल, असेही पाटील यांनी सांगितले.