चित्रकला हा राज्य सरकारच्या लेखी कायमच शेवटच्या स्थानाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे मोठे चित्र चितारणाराच मोठा चित्रकार होतो. मात्र, शिवाजीमहाराज खऱ्या अर्थाने कोणालाच कळले नाहीत. आता स्मारकाच्या रूपाने समुद्रात उभे करून त्यांना शिक्षा देणार का, असा सवाल ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी रविवारी उपस्थित केला.
मनोविकास प्रकाशनतर्फे अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झाले. दत्ता बाळसराफ आणि प्रकाशक अरिवद पाटकर या वेळी उपस्थित होते.
जीवनाचे गणित आणि वेळापत्रक बिघडवून टाकते ती कला, अशी व्याख्या सांगून प्रभाकर कोलते म्हणाले, चित्रकला ही केवळ आवड, व्यासंग किंवा व्यवसाय नसून ती एक जीवनशैली आहे. कला समजणे आणि अनुभवणे या भिन्न गोष्टी आहेत. पाश्चिमात्य चित्रकारांप्रमाणे आपल्याकडे वेडेपण जाणवत नाही. पैसे मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहणे एवढय़ा पोटार्थी दृष्टिकोनातून आपण कलेकडे पाहतो. सर्वानीच कलाकार होण्यापेक्षा कलेचे शिक्षण घेतलेल्यांपैकी काही समीक्षेकडे वळाले तरी समाजामध्ये कलाविषयक जागृती घडून येईल. आपल्याकडे पंचेंद्रियांचे कडबोळे झाले आहे. त्यामुळे चित्रकलेच्या शाळा बंद करण्याची आवश्यकता आहे. चित्राकडे चित्र म्हणूनच पाहिले पाहिजे. चित्र चितारणे हा गुन्हा ठरेल तो भारतातील कलेच्या विकासासाठी सोन्याचा दिवस ठरेल.
आयुष्यातील कुतूहल संपुष्टात येत असल्याचे सांगून अच्युत गोडबोले म्हणाले, शिक्षण हे केवळ गुणांपुरते मर्यादित राहू नये. चित्र, संगीत, साहित्य हे कलाविषय गणित आणि विज्ञानाइतकेच महत्त्वाचे आहेत. एका आयुष्यात सर्वच विषयातील ज्ञान संपादन करणे शक्य नसले तरी त्यातील मूलतत्त्वे समजून घेतली पाहिजेत.