छत्रपती शिवाजीमहाराजांचा खरा इतिहास दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असून त्यांच्या जीवनातील अनेक चांगल्या व महत्त्वपूर्ण गोष्टी प्रकाशात येऊ दिल्या नाहीत व ठरावीक गोष्टींपुरते महाराज मर्यादित ठेवण्यात आले. शिवाजीमहाराज कधीही मुस्लीमविरोधी नव्हते, तरीही तसा इतिहास रेखाटला जातो, असे मत प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी केले. शिवाजीमहाराज आज असते तर त्यांनी आपल्याला तलवार न देता लेखणी, संगणकाचा माऊस दिला असता आणि वेगवेगळी आधुनिक क्षेत्रे पादांक्रांत करा, असे सांगितले असते, असेही ते म्हणाले.
चिंचवड येथील शाहूनगरच्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘शिवचरित्रातून काय घ्यावे’ या विषयावर ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक नारायण बहिरवाडे, माजी नगरसेवक मारूती भापकर आदी उपस्थित होते. शिवरायांची युध्दनीती, आरमार उभारणी, राज्यकारभार, विविध भाषांचे ज्ञान, महिलांचा सन्मान, उदारता, धर्मनिरपेक्ष धोरण तसेच महाराजांविषयी असलेले गैरसमज व खरा इतिहास आदी विषयांवर कोकाटेंनी उदाहरणांसह भाष्य केले.
कोकाटे म्हणाले, शिवाजीमहाराजांच्या फौजेत अनेक मुस्लीम शिलेदार होते, अंगरक्षकांमध्येही मुस्लिमांचा समावेश होता. महाराजांनी अनेक मशिदींना देणगी दिल्याचे व दर्गे उभारल्याचे दाखले असतानाही त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मुस्लीमविरोधी करण्यात आली आहे. त्यामागे काहींचे हित दडलेले असून, दंगली घडवून आणण्याचे षड्यंत्रही आहे. महात्मा फुले खऱ्या अर्थाने पहिले शिवशाहीर होते. बुद्धिवादी व विज्ञानवादी असलेल्या महाराजांनी समतेचा पाया घातला, भेदाभेद पाळली नाही. ते निर्व्यसनी होते. त्यांनी कायम स्त्रियांविषयी आदर बाळगला. शिवाजीमहाराजांना मराठीचा अभिमान होता. मात्र, त्यांनी इतर भाषांचा द्वेष केला नाही, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 2:20 am