भारती विद्यापीठाच्या कुलपतिपदी डॉ. शिवाजीराव कदम यांची नुकतीच नियुक्ती झाली. या निमित्ताने भारती विद्यापीठाची भविष्यातील वाटचाल, शिक्षण पद्धत, नवनिर्मिती, नवे अभ्यासक्रम या अनुषंगाने डॉ. शिवाजीराम कदम यांच्याशी साधलेला संवाद..

भारती विद्यापीठाच्या कुलपतीपदी तुमची नियुक्ती झाली. काय भावना आहे?

गेली ४३ वर्षे भारती विद्यापीठात कार्यरत आहे. प्राध्यापक पदापासून कुलगुरू, प्र कुलगुरू अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आता कुलपतिपदी नियुक्ती झाली याचा आनंद मोठा आहे. आताच्या जगात अनेक आव्हाने समोर येत आहेत.  या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन विद्यापीठाचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. नवनिर्मिती, संशोधन, नवे अभ्यासक्रम यावर भर देण्याचा विचार आहे. आज विद्यापीठ खासगी विद्यापीठांमध्ये ५३ व्या स्थानी आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आजच्या जगासाठी तयार करणे, उत्तम नागरिक घडवणे, समाजाभिमुख काम करणे हे ध्येय आहे.\

नवनिर्मिती हा आजचा परवलीचा शब्द आहे. मात्र, नेमक्या कशा पद्धतीने नवनिर्मितीवर भर देणार आहात?

नवनिर्मितीसाठी संशोधन ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन करण्यासाठी आवाहन करत आहोत. बुद्धीला चालना देणारे, समाजासाठी उपयुक्त ठरणारे असे संशोधन झाले पाहिजे. सायबर सिक्युरिटी आज महत्त्वाची मानली जाते. मात्र, त्याची सुरुवात सर्वप्रथम भारती विद्यापीठानेच केली होती. केवळ शिक्षणावर भर देण्यापेक्षा ज्ञानाधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाला कौशल्याचीही जोड दिली पाहिजे.

शिक्षणाच्या प्रसारात खासगी विद्यापीठे महत्त्वाची ठरणार आहेत. त्या दृष्टीने भारती विद्यापीठ काय करणार आहे?

शिक्षणासाठी सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे. खासगी विद्यापीठांची चळवळ सुरू झाल्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या. आजही शिक्षणापासून वंचित असलेला मोठा घटक समाजात आहे. या घटकाला शिक्षणाशी जोडण्याचे आव्हान पेलावे लागेल. भारती विद्यापीठ ग्रामीण आणि आदिवासी भागातही काम करते. सांगली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात संस्थेच्या शाळा, महाविद्यालये आहेत. शिक्षणाचे काम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहोत.

शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करायला हवे असे आपल्याला वाटते?

प्राथमिक शिक्षणापासूनच गुणवत्तेचा आग्रह धरला पाहिजे. उच्च शिक्षण त्यानंतर येते. गुणवत्तेमध्ये अभ्यासक्रमाच्या रचनेपासून, अध्यापन, सोयीसुविधा असे सर्वच घटक समाविष्ट होतात. या सगळ्या गोष्टी साध्य झाल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षापूर्ती होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शहराइतकेच गुणवंत विद्यार्थी ग्रामीण भागातही आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायला हवे. शहरी भागात सातत्याने विकास होतोच; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना आजच्या काळाशी सुसंगत असे दृक्-श्राव्य शिक्षण, माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा निर्माण करून द्यायला हव्यात. ग्रामीण भागातही आता बदल होत आहेत. पण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

नव्या अभ्यासक्रमांबाबत काय कल्पना आहेत?

आताच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे शिकता यावे यासाठी स्वातंत्र्य देणे महत्त्वाचे आहे. तसेच रोजगारनिर्मितीच्या संधी असलेल्या अभ्यासक्रमांवरही भर आहे. शिक्षणाच्या एकूण प्रक्रियेत विद्यार्थ्यांइतकेच प्राध्यापकही महत्त्वाचे आहेत. प्राध्यापक अद्ययावत झाले, तर विद्यार्थ्यांना कालसुसंगत शिक्षण मिळेल. या सगळ्याचा विचार करून नव्या अभ्यासक्रमाचे नियोजन करत आहोत.

मुलाखत – चिन्मय पाटणकर