खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आव्हान

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार होते. त्या संदर्भात लोणावळ येथे बैठकही झाली होती, या अजित पवार यांनी जाहीर केलेल्या माहितीचा आढळराव यांनी गुरुवारी जोरदार समाचार घेतला. अजित पवारांनी आता लोणावळ्याच्या भेटीबाबत तोंड उघडायलाच लावले आहे तर त्यांनी आता या बैठकीबाबत आणखी बोलावे. मग मीही बोलतो आणि त्यांच्या राजकारणाची पद्धत जाहीर करतो, असे थेट आव्हान आढळराव यांनी पवार यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजगुरुनगर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. निवडणुका आल्या की खासदार शिवाजीराव आढळराव हे मोठय़ा प्रमाणावर वातावरण निर्मिती करतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, अशी हूलही ते उठवितात, असा आरोप हल्लाबोल आंदोलनात पवार यांनी केला होता. पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर जिल्ह्य़ाच्या राजकारणात खळबळ उडाली. या पाश्र्वभूमीवर आढळराव यांनी पवार यांच्या या विधानाचा इन्कार केला.

अजित पवार यांच्या आग्रहामुळेच मी त्यांना भेटलो. तेव्हा दिलीप वळसे पाटील यांना मी चांगलाच धडा शिकवितो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, असे पवार यांनी मला सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आग्रहामुळेच मी या बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे अजित पवारांनी आता लोणावळ्याच्या बैठकीबद्दल जास्त बोलू नये कारण आणखीही खूप काही गोष्टी मला बोलाव्या लागतील, असा इशारा आढळराव यांनी दिला. जिल्ह्यत राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना खेडचा खासदार विरोधातला का, म्हणून त्यांनी मला राष्ट्रवादीकडूनच उभे राहण्याची ऑफर दिली. मात्र मी दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेत गेल्यामुळे मी राष्ट्रवादीत का येऊ, अशी विचारणा मी त्यांच्याकडे केली. त्यावर वळसे पाटील यांना मीच धडा शिकवेन असे पवार यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर मी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही, असे आढळराव यांनी सांगितले. शिरूर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले आहे. राज्याच्या राजकारणात सक्रिय असतानाही या मतदार संघात त्यांना काहीच करता येत नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची हूल पवार यांच्याकडून उठविण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर आढळराव यांनी पवार यांना दिले. पवार आणि आढळराव यांच्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्य़ातील राजकारणात उलट-सुलट चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.