राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे ३ जानेवारी २०१६ रोजी मारुंजी येथे आयोजित ‘शिवशक्ती संगम’ या महासंमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कार्यक्रमात एक लाखांहून अधिक संघस्वयंसेवक आणि पन्नास हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह विनायक थोरात यांनी मंगळवारी दिली.
कार्यक्रमाची माहिती देताना थोरात म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात संघकार्याचा विस्तार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील नेरे, जांभे आणि मारुंजी या गावांच्या सीमेवर हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती, ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती यावेळी असेल.
या कार्यक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७७८ स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे एक लाख स्वयंसेवक गणवेशात उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या व्यवस्थांविषयी माहिती देताना महाव्यवस्थापक कैलास सोनटक्के म्हणाले की, कार्यक्रमाचा एकूण परिसर ४५० एकरांचा असून प्रत्यक्ष संघस्थान १०० एकरात आहे, २०० एकरांचा परिसर वाहनतळ म्हणून उपयोगात आणला जाणार आहे. कार्यक्रमाचे व्यासपीठ २०० फूट लांब, १०० रुंद आणि ८० फूट उंचीचे आहे. व्यासपीठावर मेघडंबरीत १८ फूट उंचीची छत्रपती शिवाजीमहाराजांची प्रतिमा ठेवली जाणार आहे. विविध किल्यांच्या प्रतिकृती असणारी १३ प्रवेशद्वारे कार्यक्रमस्थळी आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी ४३ तयारी (सिद्धता) केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तातडीच्या मदतीसाठी २०० डॉक्टर्स आणि २० रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर परत जाणाऱ्या बाहेरगावच्या स्वयंसेवकांना पुणे व पिंपरी चिंचवड येथील नागरिक ८० हजार तिखटमिठाच्या पुऱ्यांची पाकीटे- शिदोरी देणार आहेत. प्रत्येक पाकिटात दहा पुऱ्या व तिळगूळ असेल.

पहिलाच ‘डिजिटल कार्यक्रम’
कार्यक्रमासाठी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला आहे. येणाऱ्या स्वयंसेवकांची नोंद बारकोड व्यवस्थेद्वारे करण्यात येईल. संपूर्ण शिबिरावर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. सर्वाना कार्यक्रम पाहता यावा यासाठी अनेक डिजीटल स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत. प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर हेही पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

– कार्यक्रमासाठी ७० फूट उंचीचा ध्वजस्तंभ
– दहा हजार विशेष अतिथी
– मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री व लोकप्रतिनिधीही येणार
– दोन हजार स्वयंसेवकांचे घोषवादन प्रात्यक्षिक