X

राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन करू- मुख्यमंत्री

शिवकुंज इमारतीतील आई जिजाऊ व बालशिवाजी यांच्या स्मारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

राज्यातील गड किल्ल्यांचे जतन करून हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीकडे दिला पाहिजे. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून स्वतंत्र संस्था स्थापन करून राज्य सरकार मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर, प्राधान्याने किल्ले शिवनेरीच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

जुन्नर येथे आयोजित शिवप्रेमींच्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार शरद सोनावणे, विनायक मेटे, सुरेश गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी शिवनेरीभूषण पुरस्कार राजाराममहाराज जाधव यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २५००० रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी मुख्यंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या मार्गाचा अवलंब करून स्वतला राज्यकत्रे न मानता सेवक म्हणून आपण राज्याचा कारभार करू. शिवरायांची राज्यनीती, आरमार, पर्यावरण धोरणे, कृषी धोरणे आजच्या काळातही राज्यकारभार करताना प्रेरक व मार्गदर्शक ठरत आहे. शिवनेरीच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीवर कितीही भार पडला तरी तो आम्ही सहन करू आणि शिवनेरीच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू. आमदार शरद सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्याआधी, सकाळी शिवनेरीवरील आई शिवाई मंदिरात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवनेरीवरील शिवजन्मस्थळी पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून बालशिवाजींना अभिवादन करण्यात आले. मग बालशिवाजी यांच्या शिवकुंज इमारतीतील आई जिजाऊ व बालशिवाजी यांच्या स्मारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजीमहाराज व आई जिजाऊ यांच्या आशीर्वादामुळेच आपणाला राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. त्यामुळे शिवनेरीच्या विकासासाठी कुठला ही निधी कमी पडू देणार नाही. तसेच, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळालेले १६ टक्के आरक्षण न्याययालयीन वादात अडकले असले तरी निर्णय होईपर्यंत शिक्षण व नोकरभरतीत मराठा समाजाचे आरक्षण बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

  • Tags: devendra-phadanvis, maratha-reservation, shivneri,