चिन्मय पाटणकर

शिवराज्याभिषेकाची असंख्य चित्रे आपण आजवर पाहिली असतील.. मात्र, युवा कलाकार राहुल ठाकरे याने शिवराज्याभिषेकाचे अनोखे चित्र साकारले आहे. या चित्रासाठी राहुलने दहा किलो खिळ्यांचा वापर केला असून पाच महिन्यांत तब्बल ७२० तास काम करून ‘स्ट्रिंग आर्ट’ या प्रकारातील ८ फूट लांब आणि ४ फूट रुंदीचे हे चित्र त्याने साकारले आहे. या चित्रकला प्रकाराची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना राहुलने हे चित्र साकारले आहे, हेही या चित्राचे वैशिष्टय़ ठरले आहे.

मूळचा गोंदिया जिल्ह्य़ातील, सर्वसामान्य कुटुंबाची पाश्र्वभूमी असलेला राहुल पदव्युत्तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्याने मराठीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आपल्या काकूकडे त्याने ‘स्ट्रिंग आर्ट’चे चित्र पाहिले होते आणि त्याही त्यात थोडेफार काम करायच्या. त्यामुळे उत्सुकतेने त्याने त्याची माहिती घेतली. काकू करत असलेले काम पाहून आणि इंटरनेटच्या मदतीने त्याने हा प्रकार आत्मसात केला. स्ट्रिंग आर्टमध्ये लाकडी पृष्ठभागावर खिळे ठोकून त्याला धाग्यांनी जोडले जाते.

‘शिवराज्याभिषेकाचे चित्र पूर्ण करण्यासाठी खूप काम करावे लागले. अत्यंत संयम ठेवून पाच महिने काम केले. खूप वेळा हे काम सोडून द्यावे असे वाटायचे. पण निग्रहाने ही कलाकृती पूर्ण केली. चित्र पूर्ण झाल्यावरचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही,’ असे राहुलने सांगितले. माझ्या घरच्यांना या प्रकाराची काहीच माहिती नाही. त्यांना त्याचे महत्त्वही वाटत नाही. त्यांच्यासाठी मी नोकरी करणे महत्त्वाचे आहे. पण मला आता याच क्षेत्रात काम करण्यात रस आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले.

स्पर्धा परीक्षांना रामराम

विद्यापीठात शिकतानाच राहुल स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत होता. मात्र, स्ट्रिंग आर्टला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याने स्पर्धा परीक्षांना रामराम केला आहे. आता पूर्ण वेळ याच क्षेत्रात काम करण्याचा त्याचा मनोदय आहे. स्ट्रिंग आर्ट जास्तीत जास्त लोकांना शिकवून हा प्रकार वाढवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

विद्यापीठाचे दुर्लक्ष

विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेत काम करताना बरोबरच्या जवळपास १५० विद्यार्थिनींना राहुलने हा कला प्रकार शिकवला. त्यातून जवळपास १५० हून अधिक कलाकृती तयार झाल्या.

त्यानेही विद्यापीठाच्या मुख्य इमारतीची कलाकृती तयार केली आहे. मात्र या कलाकृती विद्यापीठात पडून आहेत. किमान त्याचे प्रदर्शन तरी व्हावे, अशी त्याची अपेक्षा आहे.

चित्राचा तपशील

* दहा किलो खिळे

* ८ फूट लांब आणि ४ फूट रुंदीचे प्लायवूड

* खिळे ठोकण्यासाठी २८ दिवस

* ४२ हजार ८१० खिळे