शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली, त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीला महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. या वक्तव्याचा समाचार घेत युतीला 45 नाही तर महाराष्ट्रातल्या 48 जागा मिळतील असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. एवढंच काय तर देशात 547 जागा जिंकू असाही दावा भाजपाने करायला हवा. 48 जागांमध्ये बारामतीचीही जागा आलीच असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

युती झाली त्यावर काही आश्चर्य वाटत नाही. शिवसेनेने संसार करण्याआधी ज्या काही फैरी झाडायच्या त्या झाडल्या आहेत. सत्ता, गादी आणि उब सोडायची नव्हती, उब सोडायची वेळ आल्यावर ते पुन्हा गादीवर बसले. ईडीचा दबाव होता की नाही ते माहित नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. युती झाल्याने आघाडीचे काम सोपे झाले आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सोमवारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली. ज्यानंतर या दोन्ही पक्षांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणा केली. त्यानंतर या दोन्ही पक्षांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. आता शरद पवार यांनीही युतीवर टीका करत ती होणारच होती असं म्हटलं आहे.