पुण्यातील दांडेकर पूल या ठिकाणी मुठा कालव्याला भगदाड पडल्याची बातमी गुरुवारी आली आणि त्यानंतर या पुलाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी गेलं. मात्र लोकसत्ता ऑनलाइनने घडलेली एक दुर्दैवी घटना समोर आणली. मुलाच्या क्लासच्या फीसाठी बाजूला ठेवलेली रक्कम पाण्यात वाहून गेल्याने ते पालक अक्षरश: हतबल झाले आहेत. वस्तीत राहून इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यावर क्लासची फी कशी भरायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बातमी लोकसत्ता ऑनलाइनने दिली. शेवंता सुरेश बोडेकर या महिलेने मुलाच्या जेईई प्रवेशासाठी दीड लाख रुपये जमवले होते. मात्र ते पाण्यात वाहून गेले. ही बातमी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाचली. त्यानंतर त्याची दखल घेत शिवसेना आमदार निलमताई गोऱ्हे यांना पक्षाकडून आर्थिक स्वरूपाची मदत करण्यास सांगितले.

त्यानंतर आमदार निलम गोऱ्हे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन बोडेकर कुटूंबियाची भेट घेतली आणि तात्काळ दीड लाखाचा धनादेश त्यांना देण्यात आला.यावेळी शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या की,बोडेकर कुटुंबीयांचे दीड लाख पाण्यात गेल्याची बातमी लोकसता ऑनलाइनवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहिल्यावर त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले.त्यानुसार शिवसेना पक्षाकडून या कुटूंबाला मदत दिली असून या भागातील नागरिकांसाठी शिवसेनेमार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल.असे त्यांनी सांगितले.

यावेळी शेवंता बोडेकर म्हणाल्या की,पाण्यात पैसे गेल्याने आमच्यासमोर मुलाचे शिक्षण पूर्ण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांनी दीड लाखाची मदत केल्याने मुलाचे शिक्षण होणार आहे.या मदतीमुळे शिवसेनेचे आभारी आहे.तसेच लोकसता ऑनलाइन च्या बातमीमुळे आम्हाला मदत मिळण्यास मदत झाली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.