काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी मी मूळचा शिवसेनेचाच कार्यकर्ता आणि शिवसैनिक आहे. जनतेला काय हवे आहे ते फक्त शिवसेनेलाच कळते, असा दावा गुरुवारी केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर निम्हण यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना भवनात निम्हण यांचे गुरुवारी स्वागत करण्यात आले. पक्षाचे शहर संघटक श्याम देशपांडे, अजय भोसले, सचिन तावरे तसेच चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, प्रशांत बधे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षात काम करण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी सर्व शिवसैनिक कटिबद्ध झाले आहेत, असे निम्हण म्हणाले. नऊ वर्षांनंतर परत पक्षात आलो आहे. त्याचा खूप आनंद आहे. जुन्या आणि नव्या सर्वच शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना सोडून पक्षात परत येताना शहरप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेत असे प्रथमच घडत आहे, असेही निम्हण यांनी सांगितले.
मी मूळचा शिवसैनिक आणि शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. जनतेला काय हवे आहे ते शिवसेनेला कळते. जनतेच्या अपेक्षाही शिवसेनाच पूर्ण करू शकते, असे निम्हण म्हणाले. महापालिकेची आगामी निवडणूक २०१७ मध्ये होत असून त्यासाठी तयारी केली जाईल. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. मात्र शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आले आणि ते शिवसेनेचे म्हणून निवडून आले. एकंदरित सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता मी शिवसेनेत प्रवेश केला, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही शिवसेनेशी संपर्क साधला का शिवसेनेकडून संपर्क साधला गेला या प्रश्नावर दोघांनी एकमेकांशी संपर्क केला, असेही ते म्हणाले.