भाजपा नेते राम कदम यांचं नामांतर केलं पाहिजे असा टोला शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी लगावला आहे. रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचं नाव बदललं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. राज्यातील मंदिरं उघडण्याचा निर्णय झाला असून सर्वांनी नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे, योग्य वेळी निर्णय घेतला गेला आहे असं सांगत त्यांनी श्रेय घेणाऱ्या भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. त्या पुण्यात पत्रकारंशी बोलत होत्या.

राम कदम यांच्यावर टीका
“त्यांचं नामांतर केलं पाहिजे. रामच्या जागी वेगळं नाव हवं असं मला वाटतं. मुलींचं अपहरण करण्यासाऱखी रावणाची भाषा आणि रावणासारखी भूमिका घेणारे हे असले वेगवेगळे सल्ले देत राहतात यावर जास्त भाष्य करण्याची इच्छा नाही. मला वाटतं त्यांचा मार्ग चुकला आहे आणि ते अशा पद्धतीने सातत्याने वर्तन करत आहेत,” असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना आव्हान
“भाजपाचे जे लोक सतत टीका करत आहेत त्यांच्या पाठीमागे असणारी लोकं कधी त्यांची पाठ सोडून शिवसेनेकडे किंवा इतर पक्षांकडे जातील हे कळणार नाही. खरं सांगायचं तर एखाद्या अपघातानंतर जसा बसतो तसा मानसिक धक्का यांना बसला आहे. लांब कशाला जायचं, चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा कोथरुडमधून उभं राहून दाखवावं,” असं आव्हानच निलम गोऱ्हे यांनी दिलं आहे.

बीड घटनेवर भाष्य
“बीड येथील घटना निषेधार्ह असून संबंधित आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे,” अशी माहिती निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

अयोध्या राम मंदिर निर्माण कार्यासाठी आज एक किलो चांदीची वीट निलम गोऱ्हे यांच्या हस्ते राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आली आहे.