भाजप आणि शिवसेना यांच्यामधील युतीबाबत राजकीय वर्तुळात रंगणारी चर्चा नवी नाही. सत्तेसाठी शिवसेना भाजपला सोडचिठ्ठी देत नाही, असे अनेक आरोप शिवसेनेवर झाले. भाजपला अनेक मुद्द्यावर विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनने हिंम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षासह सामान्य जनतेतून उमटल्या. त्यात आता शिवसेनेच्या खासदाराची भर पडली आहे. आम्ही सत्तेत असून नसल्यासारखे आहोत, त्यामुळे आता सत्तेतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढाळराव-पाटील यांनी पिंपरीत मांडले. भाजपशी काडीमोड घ्यावे हे वैयक्तिक मत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, सध्याच्या घडीला आम्ही सत्तेत नसल्यासारखेच आहोत. आम्ही सत्तेत असो किंवा नसो भाजपला फारसा फरक पडत नाही. सरकार बरोबर राहणं पसंत नाही. त्यांच्या बरोबर राहणं म्हणजे आपलंच नुकसान आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणेच योग्य असल्याचे वाटते.

यावेळी राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदीच्या मुद्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने निर्बंध कायम ठेवणे हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे ते म्हणाले. तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये भाजप विरोधी सरकार असून त्या ठिकाणी बैलांच्या पारंपारिक शर्यतीला परवानगी मिळाली. मात्र, आपल्याकडे राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून बैलगाडी शर्यतीवर बंदी आली. चार महिन्यानंतर वटहुकूम तयार होतो. पण हा वटहुकूमच चुकीचा होता. कायदा केला पण त्यासाठी नियम निश्चित करण्यात आले नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी आली, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.