प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझे जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे आणि त्याची पारायणं झाली पाहिजे. त्यातून समाज निश्चित घडेल आणि यातूनच आपल्याला महाराष्ट्राला पुरोगामी मार्गावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असं मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मार्तोंडकर यांनी व्यक्त केलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात छायाचित्र, पुस्तकांचे प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती निलम गो-हे, उर्मिला मार्तोंडकर, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उर्मिला मार्तोंडकर बोलत होत्या.

उर्मिला मार्तोंडकर यांनी यावेळी सांगितले की, “प्रबोधनकार ठाकरे यांनी त्याकाळी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांवर आपण पुढे जात आहोत. पण आजही वैचारिक गुलामगिरी पूर्णत: संपलेली नाही. प्रबोधन या शब्दाचा अर्थ आज दुर्देवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उद्बोधन म्हणजे प्रबोधन, यातून होणारी क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असते. प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईने पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे”.

“प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आपल्या समाजासाठी १०० वर्षापुर्वी जेवढे गरजेचे होते. त्याहीपेक्षा आजच्या समाजाला गरजेचे आहेत. महाराष्ट्र हा नेहमी पुरोगामी राज्य असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने त्यांचे साहित्य वाचले गेले पाहिजे आणि त्यांचे विचार सर्वापर्यंत पोहोचले पाहिजेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.